राज्यसभेत ‘वंदे मातरम्’वर बंदी का? शिवसेनेचा सवाल

‘प्रत्येक भारतीयाच्या नसानसात असलेले ‘वंदे मातरम्’ हे शब्द उच्चारण्यास देशाच्या राज्यसभेतच मनाई आहे. त्याकडे उपराष्ट्रपतींचे लक्ष वेधूनही तो नियम रद्द करण्यात आलेला नाही. असे का,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत केला.

‘वंदे मातरम्’ला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेत ते बोलत होते. यावेळी सावंत यांनी सध्याच्या टोकाच्या विरोधाभासाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ‘राज्यसभेत आजही एक नियम आहे. त्यानुसार राज्यसभा सभागृहात थँक्यू, थँक्स, जय हिंद, ‘वंदे मातरम्’ हे शब्द उच्चारता येत नाहीत. आम्ही अलीकडेच उपराष्ट्रपतींना भेटलो होतो; मात्र तो नियम अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘वंदे मातरम्’ हे प्रखर राष्ट्रभक्तीतून जन्मलेले गीत आहे. हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांना कसे स्फुरले त्याची आठवणही सावंत यांनी सांगितली. हेच गीत गात-गात नंदुरबारच्या शिरीषकुमार या कोवळ्या मुलाने ब्रिटिशांच्या गोळ्या झेलून हौतात्म्य पत्करले, तर अरुणा असफअली यांनी याच गीताच्या आधारे ब्रिटिशांविरोधात वातावरण निर्माण केले, असे सावंत म्हणाले.

पुन्हा तोच नारा द्यावा लागेल!

‘संविधानाच्या मुळावरच घाव घातला जात आहे. रोजच्या रोज हल्ले होत आहेत. एकही संस्था स्वतंत्र नाही. त्यांना स्वतंत्र करण्याची लढाई पुन्हा करावी लागेल. मणिपूरमध्ये आजही ‘वंदे मातरम्’ची गरज आहे. त्यामुळे पुन्हा ‘वंदे मातरम्’चा नारा द्यावा लागेल, असे अरविंद सावंत म्हणाले. ज्या मातृभूमीचे गुणगान आपण करतो, त्या भूमीतील लोक आजही न्यायाची अपेक्षा करत आहेत. कर्नाटकमध्ये बेळगाव, कारवार, बिदर, भालकीच्या लोकांना महाराष्ट्रात यायचे आहे. गेल्या 60 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशातील कोणती संस्था आत्मनिर्भर आहे?

‘देशाचे पंतप्रधान आत्मनिर्भरतेचा उल्लेख करतात. आत्मनिर्भर होणे चांगले आहे, पण आपण खरोखरच आत्मनिर्भर आहोत का? न्यायव्यवस्थेपासून कुठलीही संस्था घ्या. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी किंवा निवडणूक आयोग, एकही संस्था आत्मनिर्भर नाही. आत्मभान ठेवून काम करत नाही. इथेसुद्धा वंदे मातरम्ची गरज आहे, असे सावंत म्हणाले.

त्यांनी कधी साधा राष्ट्रध्वज फडकवला नाही!

‘वंदे मातरम्’बद्दल आज ज्यांना कळवळा आला आहे त्यांच्या पितृसंघटनेने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कधी आपल्या कार्यालयावर साधा राष्ट्रध्वज फडकवला नाही. डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या कुठल्याही पुस्तकात ‘वंदे मातरम्’चा साधा उल्लेखही नाही, हेही सावंत यांनी निदर्शनास आणले.