
पश्चिम उपनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित तसेच ‘शालेय ऑलिम्पिक’ असा लौकिक असलेल्या 46 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा धमाका बुधवारपासून सुरू होणार आहे. 10 ते 13 डिसेंबरदरम्यान आयोजित होणाऱ्या या महोत्सवात वांद्रे ते दहिसर या उपनगरातील 200 पेक्षा अधिक शाळा आणि सहा हजारांपेक्षा अधिक शालेय खेळाडूंचा सहभाग असेल. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, मल्लखांब या मराठमोळय़ा खेळांसह ऍथलेटिक्स बुद्धिबळ, कराटे, टेनिस, जलतरण आणि तिरंदाजी अशा विविध खेळांचाही समावेश असल्यामुळे या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महोत्सवाचे उद्घाटन सुप्रिया लाइफस्टाइलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश वाघ यांच्या हस्ते केले जाणार आहे.
‘या महोत्सवाला चार दशकांचा इतिहास लाभला असून पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या शाळा मोठय़ा प्रमाणात सहभागी होतात. या महोत्सवात चमकलेल्या खेळाडूंनी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडलेली आहे, असे संस्थेचे कार्यवाह गोविंद गावडे यांनी सांगितले. प्रत्येक खेळात सर्वाधिक गुण कमाई करणाऱया शाळांना सांघिक पुरस्कार दिले जातात. एकत्रितरीत्या अव्वल ठरणाऱ्या शाळेला ‘प्रबोधन ग्रॅण्ड ट्रॉफी’ चा बहुमान प्राप्त होतो.


























































