शिवसेनेच्या मनीबॉम्बवर शिंदे गटाचा आमदार घायाळ, पैशांच्या बंडलांसोबत दिसणारा ‘तो’ आमदार कोण? अंबादास दानवे यांच्या व्हिडीओमुळे उडाली खळबळ

लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीसमोर पैशांच्या बंडलांची रास पडलीय, असा व्हिडीओ आज शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला. ‘हा आमदार कोण आहे, पैशांच्या गड्डय़ांसह तो काय करतोय’, असा सवाल त्यांनी या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. दानवे यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र या ‘मनीबॉम्ब’ने शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी घायाळ झाले. हा मॉर्फ व्हिडीओ आहे, माझा काही संबंध नाही, असे सांगत त्यांनी आगपाखड केली. शिवसेनेच्या या मनीबॉम्बने हिवाळी अधिवेशनात कडाक्याच्या थंडीत वातावरण चांगलेच तापले. विधिमंडळातही याचे पडसाद उमटले.

अंबादास दानवे यांच्या मनीबॉम्बवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात शिंदे गटाकडून दानवे यांना लक्ष्य करण्यात आले. त्याला दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात आपण तक्रार करणार असून व्हिडीओमध्ये दिसणाऱया नोटा कुणाच्या आहेत हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.

आमदाराच्या जवळच्या व्यक्तीनेच व्हिडीओ दिला!

हा व्हिडीओ महेंद्र दळवी यांच्या जवळच्याच माणसाने आपल्याला दिल्याचे दानवे यांनी सांगितले. बँकेत 50 हजार भरले तरी नोटीस पाठवली जाते, इथे तर नोटांची रास दिसतेय. योग्य चौकशी झाल्यावर सगळे समोर येईल. संजय शिरसाट यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला होता. घरातला व्हिडीओ बाहेरचे लोक काढू शकतात का? हा व्हिडीओही घरातला वाटतोय. त्या आमदारांना या नोटा कसल्या आहेत सगळे माहिती आहे, असे दानवे म्हणाले.

हे 50 खोकेच तर आहेत!

संबंधित व्हिडीओत आपण असल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असे महेंद्र दळवी म्हणाले होते. त्यावर कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा आरोप करण्यासाठी हा व्हिडीओ आपण पोस्ट केलेला नाही. फक्त महाराष्ट्राला हे दाखवायचे होते, असे दानवे म्हणाले. ‘50 खोके एकदम ओके म्हणताना’ त्यांना राग येत होता, आता हे 50 खोकेच तर आहेत, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

दळवींसमोर दिसणाऱ्या व्यक्तीलाही मी ओळखतो

दानवे यांना तो व्हिडीओ सुनील तटकरे यांनी पुरवल्याचा आरोप आमदार दळवी यांनी केला होता. त्यावर आपले तटकरे यांच्याशी सध्या बोलणेही होत नाही, असे दानवे म्हणाले. महेंद्र दळवी यांच्यासमोरील व्यक्तीलाही मी ओळखतो, म्हणूनच मी व्हिडीओ पोस्ट केला आहे, तीच मुख्य व्यक्ती आहे, पोलिसांनी तिचा शोध घ्यावा, असे दानवे म्हणाले.

आणखी व्हिडीओ बाहेर येतील, चौकशी करा

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत या व्हिडिओबाबतचा मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी चौकशीची मागणी केली. यापूर्वीही असे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि यापुढेही बाहेर येतील, त्यामुळे यामागे नक्की काय आहे हे जनतेला कळले पाहिजे असे ते म्हणाले. या सगळ्यामुळे सभागृह आणि लोकप्रतिनिधींबद्दल जे चित्र उभे राहत आहे ते भीषण आहे. म्हणून या सर्वाची सभागृहाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी, असे शिंदे म्हणाले.

व्हिडीओत काय?

अंबादास दानवे यांनी एका व्हिडीओ कॉलचा संदर्भ देत तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यातील एक व्हिडीओ 11 सेकंदाचा तर दुसरा व्हिडीओ 6 सेकंदाचा आहे. लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती नोटांच्या बंडलांसोबत बसलीय आणि बंडलं मोजतेय, असे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओत या व्यक्तीचा चेहरा मात्र दिसत नाही. ‘या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्डय़ांसह काय करत आहेत?’ असा सवाल दानवे यांनी आपल्या पोस्टमधून विचारला.