अभिमान! दिवाळी युनेस्कोच्या यादीत

जगाला आकर्षित करणाऱया हिंदुस्थानच्या समृद्ध संस्कृतीवर पुन्हा एकदा मान्यतेची मोहोर उमटली आहे. हिंदुस्थानचा महाउत्सव असलेल्या ‘दिवाळी’ सणाला ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाले आहे. हा सण ‘युनेस्को’च्या ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’ यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘युनेस्को’ने बुधवारी याची घोषणा केली असून यामुळे अखिल हिंदुस्थानींची मान अभिमानाने उंचावली आहे.

‘युनेस्को’च्या आंतर-सरकारी समितीची बैठक दिल्लीत सुरू असतानाच ही बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.

दिल्लीत विशेष दीपोत्सव

‘युनेस्को’च्या निर्णयाचे देशभरातून स्वागत केले जात आहे. दिल्लीत राज्य सरकारच्या पुढाकाराने खास दीपोत्सव होणार आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात सजावट करून दीप उजळले जाणार आहेत. तसेच वेगवेगळय़ा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केले जाणार आहेत.