भीक मागण्यावर बंदी येणार

राज्यात आता भीक मागण्यावर बंदी येणार आहे. महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक आज विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले. या विधेयकाबद्दल सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खुद्द उपसभापतीही असमाधानी असताना विधेयक मंजूर केले गेले. त्यामुळे येत्या शनिवारी त्यावर सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. त्यावर दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या. सत्ताधारी पक्षाचे आमदार मनीषा कायंदे, अमोल मिटकरी यांच्यासह अनेकांनी या विधेयकाबद्दल नाराजी व्यक्त केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही असमाधान व्यक्त केले. खरंतर हे विधेयक महारोगी हा शब्द वगळण्यासाठी आले होते; परंतु त्याचे शीर्षक पाहिले तर ताळमेळच लागत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. विधेयकाबाबत माहिती देणाऱया पुस्तिकेत देण्यात आलेले स्पष्टीकरण पटत नसल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

मुंबईत राहतोय सर्वात श्रीमंत भिकारी

राज्यातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतो. त्याच्याकडे 7 कोटी 32 लाखांची मालमत्ता आहे. तसेच ठाण्यामध्ये त्याचा टू बीएचकेचा फ्लॅट आणि स्टोअर रूम्सही आहेत, अशी माहिती शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत या विधेयकावर बोलताना दिली तेव्हा सर्वजण अवाक् झाले. या सर्वात श्रीमंत भिकाऱयाचे नाव आहे भरत जैन. जैन हा सुशिक्षित भिकारी आहे, असेही अहिर यांनी सांगितले.