
भाजपचे सरकार असलेल्या ओडिशा विधानसभेत एक नवीन विधेयक मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील आमदार आणि मंत्र्यांच्या पगारात एकमताने भरमसाट वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक आमदाराला आता 3.45 लाख रुपये प्रति महिना पगार मिळणार आहे. याआधी हा पगार 1.11 लाख रुपये होता. आमदाराच्या पगारात अवाच्या सवा वाढ करण्यात आली आहे. आमदाराला हा पगार येत्या जून महिन्यापासून लागू होणार आहे. आमदाराला मिळणारा पगार हा सर्व राज्यांतील आमदारांपेक्षा सर्वात जास्त आहे.
सभागृहात या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांनी याचे स्वागत केले. तसेच सध्याची जबाबदारी आणि वाढत्या गरजा लक्षात घेता एवढा पगार आमदारांना मिळायलाच हवा, असे सांगत याचे समर्थन केले आहे. विधानसभेत एकूण चार संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि सर्व आमदारांना मिळणारे वेतन, भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. या विधेयकात काही महत्त्वपूर्ण बदलही करण्यात आले आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आमदाराचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
ओडिशाने सर्वांना मागे टाकले
ओडिशा हे राज्य आता आमदाराला सर्वात जास्त पगार देणारे अव्वल राज्य बनले आहे. दुसऱ्या नंबरवर तेलंगणा राज्य आहे. येथील आमदाराला 2.50 लाख रुपये, दिल्लीतील आमदाराला 2.25 लाख रुपये, महाराष्ट्रातील आमदाराला 2 लाख रुपये, उत्तर प्रदेशातील आमदाराला 1.87 लाख रुपये, तर कर्नाटक आणि बिहारमधील आमदाराला 1.60 लाख रुपये पगार मिळतो. सर्वात कमी पगार केरळमधील आमदाराला 70 हजार मिळतो.



























































