
राज्य सरकारने आणलेल्या पुरवणी मागण्या आर्थिक गरजेपेक्षा निवडणूकपूर्व राजकीय स्वार्थाने प्रेरित आहेत, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. 7.5 लाख कोटींचे बजेट आता 8 लाख 90 हजार कोटींवर पोहोचून मूळ अर्थसंकल्प तब्बल 17.53 टक्क्यांनी फुगला आहे. राज्याचे एकूण कर्ज 9,32,000 कोटींपर्यंत पोहोचले असून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82 हजारांचे कर्ज आहे. ही वाढ म्हणजे सरकारकडे कोणतीही दूरदृष्टी नसल्याचे द्योतक असल्याची टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून दररोज 6 खून आणि 23 बलात्काराच्या घटना घडत आहेत, अशी खळबळजनक माहिती देतानाच, गृह विभाग काय करतोय, असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या गृहखात्यावर टीका केली. सतेज पाटील यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी गृह विभागाची लक्तरे काढली. राज्यातील महिला आणि मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा फलटणमधील डॉ. संपदा मुंडे प्रकरण असेल अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेवर डाग पडला असे सतेज पाटील म्हणाले.



























































