
सोलापूरहून संभाजीनगरकडे डिझेल घेवून चाललेल्या टँकरला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने डिझेलचा टँकर पलटी झाला आणि टँकरला आग लागली. टँकरमधील डिझेल हायवेवर पसरल्याने हायवेचा आगवे झाला. भयंकर अग्नितांडव मांजरसुंब्याच्या घाटामध्ये पहाण्यास मिळाले. टँकर पूर्णपणे जळून भस्मसात झाले आहे. या भयंकर आगीच्या लोळामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. दोन्ही वाहनातील चालकांनी गांभीर्य ओळखून उड्या मारून आपला जीव वाचवला.
बीडपासून अवघ्या काही कि.मी.वर असलेल्या मांजरसुंबा घाटामध्ये सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास विचित्र अपघात झाला. सोलापूरहून संभाजीनगरकडे डिझेल घेवून जाणार्या टँकरला भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिली. त्यात टँकर पलटी झाला आणि टँकरमध्ये असलेल्या डिझेलचा स्फोट झाला. अवघ्या काही क्षणामध्ये टँकरने पेट घेतला. टँकरमधील डिझेल कित्येक अंतरावर रस्त्यावर पांगल्या गेले. डिझेल रस्त्यावर पांगल्याने संपूर्ण रस्ताच आगमय झाला. मांजरसुंब्याच्या या घाटात आगीचे भयंकर अग्नितांडव पाहाण्यास मिळाले. रस्त्यावर आग आणि आकाशात धुराचे लोळ भयभीत घटनेमुळे धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आगीमुळे राष्ट्रीय महामार्गाचे तर नुकसान झालेच त्या बाजूने असणारी झाडेही होरपळून गेली तर काही जळून गेली. तासाभराने पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजूची ट्रॅफीक आणि वाहतूक पांगवून आग विझवण्याचे काम सुरू झाले. अवघ्या काही क्षणामध्ये टँकरचा अक्षरश: कोळसा झाला. या भयंकर दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही वाहनातील चालकांनी उड्या मारून आपला जीव वाचवला.
अग्निशामक दलाची गाडीच मिळाली नाही
आगीची घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने अग्निशामक दलाला कळवण्यात आले. मात्र बीड नगर पालिकेकडे एक गाडी उपलब्ध होती. केवळ एका गाडीने परिसरात लागलेली आग विझवता येत नसल्याने गेवराई अग्निशामक दलाकडून अतिरिक्त गाड्या मागवण्यात आली. गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन कि.मी.अंतरापर्यंत वाहतुकीची रांग लागली होती. आणि तोपर्यंत जळत असलेल्या वाहनाचा अक्षरश: कोळसा झाला होता. या आगीमध्ये एक कि.मी.अंतरापर्यंत गवतांनी आणि रस्त्याच्या कडेला असणार्या झाडांनी पेट घेतला.


























































