
>> अभय मिरजकर
`जुने ते सोने’ असे म्हटले जाते. रत्नागिरी जिह्यातील दापोली तालुक्यातील असुदे येथील पुरातन अशा श्री केशवराज मंदिरातील गोमुखातून पडणारे पाणी पाहून प्रत्येक जण अचंबित होऊन जातो आणि `जुने ते सोने’ असे हमखास म्हणतोच. बारमाही पाणी वाहत असलेले हे ठिकाण आहे. उन्हाळ्यात पाण्याची धार थोडी कमी असते, पण पावसाळ्यात जोरदार पाणी वाहते. पाण्याचे उत्तम व्यवस्थापन कसे करावे हे प्रत्यक्ष शिकण्यासाठी या स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत.
उन्हाळ्याची सुरुवात झाली की, पाणी टंचाई निर्माण झाली हे चित्र काही बदलत नाही. कोकणात भरपूर पाऊस पडतो, पण पाणी वाहून जाते आणि कायम पाणी टंचाई जाणवत असते. परंतु कोकणात अनेक ठिकाणी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा वापर केलेला आढळून येतो. निसर्गरम्य परिसरात असणारे पुरातन असे श्री केशवराज मंदिर असुदे दापोली येथे आहे. गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण 1000 वर्षे जुने आहे असे सांगितले जाते. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून 12 महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती, तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णूमूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णूमूर्तीच्या हाती शंख, पा, गदा, पद्म अशी चार आयुधे आहेत.
या ठिकाणी मंदिरातील गोमुखातून जे पाणी वाहत असते. हे पाणी व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यांमध्ये पण काही ठिकाणी असे पाणी व्यवस्थापन केलेले पाहण्यास मिळते. ही एक पारंपरिक जल व्यवस्थापन प्रणाली आहे, ज्यामध्ये डोंगरावरून येणारे पाणी दगडी पायऱयाच्या माध्यमातून आणि छोटय़ा खाचांमधून नेले जाते. नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱया पाण्याचा योग्य वापर करणे हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्टय़ आहे. पाणी व्यवस्थापन शिकवण्यासाठी अशा स्थळांना भेटी देणे आवश्यक आहे.




























































