
>> आशिष निनगुरकर
मुलं आणि आपलं कुटुंब आनंदी व तितकंच सक्षम राहण्यासाठी पालक म्हणून आपण सुजाण असणे ही सध्याची गरज. आजच्या परिस्थितीत पालकत्व हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. म्हणूनच मुलांच्या वर्तमान आणि भविष्यासाठी आपण सजग असायला हवे.
आपल्या आदर्श नीतिमूल्यांची जपणूक आपण करायला हवी. आम्हाला वडीलधाऱयांनी जे काही चांगले शिकविले, ज्या-ज्या गोष्टी आमच्याकडून आयुष्य घडवण्यासाठी करून घेतल्या त्या-त्या आम्ही आमच्या मुलांकडून करून घेणे अपेक्षित आहे. यातून मुले धीट बनतील, त्यांना शिस्तीचे महत्त्व कळेल. हे सगळे आपल्या मुलांसाठी, त्यांच्या सुरक्षित भल्यासाठी आणि सशक्त समाजासाठी आवश्यकच आहे. आदर्श पालक होण्यापेक्षा आनंदी पालक होण्यासाठी प्रयत्न करा. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा यासाठी मुलांना ‘काऊंसिलिंग क्लासेस’ सुरू करण्याची आज गरज आहे. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ‘टीचर इज अ सेकंड मदर.’ शिक्षिका ही विद्यार्थ्याची दुसरी आई असते. त्यामुळे बालमनाला आकार अशा प्रकारे देता येणे शक्य आहे.
घरातील मुलांमध्ये किंवा नातेवाईकांच्या मुलांमध्ये तुलना अजिबात करू नका. तुलनेमुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन ते मानसिकदृष्टय़ा खचण्याचा संभव असतो. त्यामुळे त्यांची दुसऱया कोणाशीही तुलना करू नका. मुलांच्या यशात वाटेकरी होणारे पालक कधी-कधी मुलांच्या अपयशाला सर्वस्वी त्यांनाच जबाबदार ठरवतात. यामुळे मुलांमध्ये अपराधीपणाची भावना वाढीस लागते. मुलांच्या जवळ बसून परीक्षेचा रिझल्ट काहीही लागला तरी तो आपण सर्व जण मिळून स्वीकारू असा विश्वास मुलांना देणे गरजेचे आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा असणे साहजिकच आहे. त्यामुळे कोणतेही क्षेत्र निवडताना त्यात शंभर टक्के देऊ शकतो का? याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
परीक्षेनंतर रिझल्टचं टेन्शन मुलांपेक्षा पालकांना आलेलं असतं. यातूनच दिवसा-रात्री कधीही किती मार्क्स मिळतील रे, अशी विचारणा करून मुलांना भंडावून सोडू नका. यापेक्षा त्याला रस असलेली क्षेत्रं जाणून घ्या. पालक-मुलं यांच्यातला संवाद चांगला असेल तर काही अडचणींवर सहज मात करता येते. पालकांनीही आपल्या मुलाचं भवितव्य लक्षात घ्यावं. लोक काय म्हणतील ही तुम्हाला वाटणारी भीती मुलांवर लादू नये. मुलांच्या हिताचा जो निर्णय घ्याल त्यात त्यांना सहभागी करा. चर्चेनंतरच निर्णय फायनल करा. तुमच्या मुलांना तुम्ही नकारात्मक प्रतिािढया देण्यापेक्षा जास्त वेळा त्यांची स्तुती करण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. तुमची मुले काही चुकीचे करत असताना त्यांना सांगणे महत्त्वाचे असले तरी त्यांना सकारात्मक भावना निर्माण करण्यात मदत करणेदेखील महत्त्वाचे आहे. तुमची मुलं बोलत असताना त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्या. तुमच्या मुलांशी मुक्त संवाद साधणे महत्त्वाचे आहे, म्हणून जेव्हा ते तुमच्याकडे प्रश्न किंवा चिंता घेऊन येतात तेव्हा तुम्ही थांबण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वेळ काढल्याची खात्री करा.
अनेकदा असं होतं की, मुलं एखाद्या शाखेतून ग्रॅज्युएशन करतात, पण आवडीमुळे संपूर्ण क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतात. अशा वेळी मुलांना सपोर्ट करा. क्षेत्र बदललं तरी आधी घेतलेलं शिक्षण कधीच फुकट जात नाही. ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचलेली मुलं आपल्या आयुष्याचा गंभीरपणे विचार करू शकतात. तेव्हा त्यांचं मत जाणून घेऊन त्यावर विचार करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तो चर्चा करून सोडवता येऊ शकतो. पैसे आणि समाधान या गोष्टींसाठी नोकरी करणं अत्यावश्यक आहे. मात्र केवळ पैसे तुम्हाला समाधान मिळवून देऊ शकत नाहीत. तेव्हा कामाचं समाधानही महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊन ड्रीम जॉब निवडायला हवा. त्यासाठी रीतसर प्लॅनिंग करा. साहजिकच, हे एक आव्हान असू शकते, विशेषत: जेव्हा तुमची मुलं कृती करत असतील किंवा भिंती खराब करत असतील, तर अशा वेळी तुम्हाला कितीही राग आला तरी मोठय़ाने न ओरडता, ते डाग मिटवण्यासाठी त्यांना सहभागी करा व ते किती कठीण आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द्या.
पालक म्हणून तुम्ही करू शकणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवर आपला चांगला प्रभाव असणे. जर तुम्ही तुमच्या मुलांकडून विशिष्ट वर्तनाची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला ते तुमच्या कृतीतून दाखवले पाहिजे. जसे की, तुमची मुले सभ्य आणि दयाळू व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल, तर रहदारीत एखाद्या व्यक्तीकडून चूक झाल्यास मुलांसमोर मोठय़ाने ओरडू नका. तुमच्या मुलांनी घरातील कामात मदत करावी असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही स्वत: घराची साफसफाई करत असताना मदत करा. तुम्ही सोफ्यावर बसता तेव्हा त्यांना त्यांची खोली स्वच्छ करण्यास सांगू नका. मुलांनी त्यांच्या डिजिटल उपकरणांपासून दूर रहावे असे वाटत असेल, तर तुम्ही त्यांच्यासमोर फोनवर जास्त वेळ घालवू नका.
आपली पालकत्व शैली ही मुलाच्या आजच्या आणि भविष्यात त्याच्या वर्तनावर परिणाम करते. पालक आपल्या मुलांना कसे वाढवत हे त्यांच्यातील नातेसंबंध निर्धारित करण्यासाठी मदत करतात. प्रत्येक पालकांना आपली मुले नेहमी आनंदी आणि प्रगती करावी अशी अपेक्षा असते. यासाठी बरेच पालक आपल्या मुलांबरोबर अधिक कडक शिस्त बाळतात, काही मोकळे सोडून देतात. याबाबत आपणच योग्य ती काळजी घ्यायला हवी.




























































