साखरझोपेत असलेल्या कुटुंबावर प्लास्टर कोसळले; एक ठार

साखरझोपेत असलेल्या कुटुंबीयांच्या अंगावर छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. लोकमान्यनगर पाडा नंबर 2 परिसरातील करुमेदेव सोसायटीत ही घटना घडली. या घटनेत घरातील मनोज मोरे (45) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी अर्पिता (42) व मुलगा आरुष (16) हे जखमी झाले आहेत. प्लास्टरचा भाग कोसळून झालेल्या आवाजामुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

करुमेदेव ही तळ अधिक सात मजली इमारत असून 16 वर्षे जुनी आहे. इमारतीत एकूण 53 सदनिका आहेत. या इमारतीच्या टेरेसवर असलेल्या 802 क्रमांकाच्या रूममध्ये ही दुर्घटना घडली. ही रूम कलावती वर्मा यांच्या मालकीची असून मोरे कुटुंबीय तेथे भाड्याने राहत होते. भाडोत्री मनोज मोरे हे त्यांच्या पत्नी व दोन मुलांसह हॉलमध्ये झोपलेले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास छताचे प्लास्टर त्यांच्या अंगावर कोसळले. या घटनेत मनोज मोरे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नाच्या डोक्याला आणि मुलगा आरुषच्या दोन्ही पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांची नऊ वर्षीय मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही.