घणसोलीतील माथाडी कामगार घालणार आज पालिकेचे श्राद्ध

घणसोली येथील सेक्टर 7 मधील सिम्प्लेक्स या माथाडी कामगारांच्या वसाहतीत असलेल्या इमारतींची दयनीय अवस्था झालेली आहे. या इमारतीतील वास्तव्य हे धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटी खडकपूर आणि व्हीजेआयटी मुंबई या संस्थांसह कोकण आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिला आहे. मात्र त्यानंतरही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे या इमारतींना आयोग्य असल्याचा दाखला देत नाहीत. त्यामुळे सिम्प्लेक्समधील माथाडी कामगार उद्या पालिकेचे श्राद्ध घालून निषेध करणार आहेत.

सिम्प्लेक्स सोसायटीमध्ये सुमारे साडेतीन हजार कुटुंब वास्तव्य करतात. येथील इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे वसाहतीच्या पुनर्विकासात विघ्न निर्माण झाल्याने रहिवासी अडचणीत आले आहेत. राजकीय दबावातून एका बिल्डरची नियुक्ती प्रकल्प उभा करण्यासाठी रहिवाशांनी केली होती. त्यानुसार 800 रहिवाशांनी आपली घरेही रिकामी केली. मात्र या बिल्डरने गेल्या आठ महिन्यांपासून या रहिवाशांना घराचे भाडे दिलेले नाही. दडपशाहीला विरोध करण्यासाठी रहिवाशांनी उद्या सकाळी साडेदहा वाजता सर्वसाधारण सभा ठेवली आहे. या सभेत रहिवासी मुंडन करून नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे श्राद्ध घालणार आहेत असे गुरुदेव दत्त हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष संदीप लटांबळे यांनी सांगितले.