
पैसा, मतचोरी, निवडणूक आयोगाची मदत यामुळे लोकसभा- विधानसभा निवडणुका जिंकायच्या व जिंकल्यावर त्या विजयाचे सर्व श्रेय भाजप मुख्यालयाच्या विजय सोहळ्यात मोदी यांना देऊन मोकळे व्हायचे हेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे काम झाले आहे. लोकशाही देशात उरलीच नाही. त्यामुळे ती भाजपमध्ये तरी कशी असेल? त्यामुळे चार ओळींचा एक आदेश काढून भाजपने नवीन कार्यकारी अध्यक्ष नेमला. मोदी म्हणतात, कार्यकर्त्याचा सन्मान झाला. आता मोदी म्हणतात म्हणजे ते मानायलाच हवे, पण भाजप अंतर्गत त्यास मान्यता आहे काय? अर्धा भाजप नबीन यांच्या नेमणुकीच्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. भाजपमधील अल्बर्ट आईन्स्टाईनचा हा नवा शोध, नवा प्रयोग आहे!
गेल्या दहा-बारा वर्षांत भारतीय जनता पक्ष म्हणजे एक अजब रसायन किंवा प्रयोगशाळा बनली आहे. मोदी-शहा हे अल्बर्ट आईन्स्टाईनच्या भूमिकेत असतात व नवे शोध, नवे प्रयोग करून लोकांना आश्चर्यचकित करण्याचे प्रयत्न करीत असतात. संघ परिवार व मोदी-शहांच्या वादात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड दोनेक वर्षांपासून रखडून पडली होती. मोदी-शहांना ज्या नावात रस होता, त्या नावांना संघ मुख्यालय मान्यता देत नव्हते. अशा नावात भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश होता. ही दोन्ही नावे मोदी-शहांच्या अंतर्गत गोटातली मानली जातात, तर संघाने जी नावे समोर आणली त्यात नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान व संजय जोशी यांचा समावेश होता. ही सर्व नावे बाजूला पडली व बिहारच्या बाहेर फारसे माहीत नसलेले नितीन नबीन हे 45 वर्षांचे तरुण, तडफदार भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी एक आदेश जारी केला व नबीन महाशयांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केल्याचे जाहीर केले. नितीन नबीन यांच्या नेमणुकीने भाजपांतर्गतही खळबळ माजली आहे. या नावाची कोठेच चर्चा नव्हती. नितीन नबीन हे बिहारात पाच-सात वेळा आमदार झाले, त्यांनी मंत्रीपदे भूषवली, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघटनात्मक बांधणीचे काम केले वगैरे ठीक आहे, पण त्यांना आता एकदम राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करून मोदी-शहांनी कोणाला धक्का दिला आहे? पंतप्रधान मोदी यांनी नव्या नियुक्तीनंतर म्हटले आहे, “नितीन नबीन यांनी मेहनतीने कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केली आहे. ते युवा आणि कष्टाळू नेते असून त्यांच्याकडे मोठा
संघटनात्मक अनुभव
आहे. त्यांची ऊर्जा आणि समर्पण पक्षाला अधिक बळकट करेल.’’ पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी एका कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमले. नबीन हे बिहारच्या बाहेर परिचित नाहीत. त्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर काही भूमिका पार पाडल्या व आता अचानक राष्ट्रीय जबाबदारी त्यांच्यावर पडली. पक्षाच्या व देशाच्या सर्वोच्च पदी मोदी-शहांना बिनचेहऱ्याचीच माणसे हवी असतात व अशा बिनचेहऱ्याच्या माणसांचा शोध ते सातत्याने घेत असतात. बिनचेहऱ्याचे व बिनपाठकण्याचे लोक हेच भाजपच्या सध्याच्या राजकारणाचे बळ आहे. निवडणूक आयोगापासून न्यायालये, राजभवन, राष्ट्रपती भवनापर्यंत गेल्या दहा-बारा वर्षांत अशाच लोकांच्या नियुक्त्या झाल्या व धक्कातंत्र, नवा प्रयोग म्हणून मोदी-शहांनी आपली पाठ थोपटून घेतली. जेपी नड्डा हे याच निकषावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले व आता नितीन नबीन हे पाटणाहून त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी दिल्लीत दाखल होत आहेत. नड्डा हेदेखील आधी कार्यकारी अध्यक्ष होते. नंतर पूर्ण अध्यक्ष झाले. नितीन नबीन यांच्या नियुक्तीने पक्ष संघटना आपल्या ताब्यात असल्याचे मोदी-शहांनी दाखवून दिले. ‘इंदिरा इज इंडिया’ अशा घोषणा त्या काळात देवकांत बरुआ वगैरे लोकांनी दिल्या. आता ‘मोदी म्हणजेच भाजप’ अशा गर्जना सुरू आहेत. भाजपच्या अध्यक्षपदाची नियुक्ती संघाने रोखून धरली. अशा अफवा मधल्या काळात पसरल्या त्यात कितपत तथ्य असावे? हा नितीन नबीन यांच्या नियुक्तीनंतर प्रश्नच पडतो. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना
संघाची अशी भूमिका
होती, अध्यक्षाने सरकारी कामात लक्ष घालू नये. पक्ष संघटन हे सत्तेच्या वर असायला हवे व पक्षाच्या अध्यक्षात इतकी ताकद हवी की, त्याने पंतप्रधान, मंत्र्यांकडे न जाता या सत्ताधाऱ्यांनी चर्चेसाठी त्यांच्याकडे यायला हवे. संघाची ही भूमिका योग्य आहे व हे असेच घडायला हवे, पण नितीन नबीन यांच्या नियुक्तीने संघाचा हेतू सफल होईल काय? हे नवनियुक्त तरुण, तडफदार कार्यकारी अध्यक्ष उद्या पूर्णवेळ अध्यक्ष झाले तरी मोदी-शहा वगैरे पक्ष मालकाच्या डोळ्यांत डोळे घालून चर्चा करण्याचे बळ त्यांच्या अंगी उतरेल काय? हा प्रश्न म्हणजे गहन प्रश्नच आहे. मोदी-शहांना आपल्या नजरेच्या धाकात व मुठीत राहणारा पक्षाचा अध्यक्ष हवा होता व तसा त्यांनी नेमला. नितीन नबीन यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली हा एका कार्यकर्त्याचा सन्मान आहे. अर्थात नबीन यांच्या कार्यकाळात नवीन काय घडणार? पैसा, मतचोरी, निवडणूक आयोगाची मदत यामुळे लोकसभा- विधानसभा निवडणुका जिंकायच्या व जिंकल्यावर त्या विजयाचे सर्व श्रेय भाजप मुख्यालयाच्या विजय सोहळ्यात मोदी यांना देऊन मोकळे व्हायचे हेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे काम झाले आहे. लोकशाही देशात उरलीच नाही. त्यामुळे ती भाजपमध्ये तरी कशी असेल? त्यामुळे चार ओळींचा एक आदेश काढून भाजपने नवीन कार्यकारी अध्यक्ष नेमला. मोदी म्हणतात, कार्यकर्त्याचा सन्मान झाला. आता मोदी म्हणतात म्हणजे ते मानायलाच हवे, पण भाजप अंतर्गत त्यास मान्यता आहे काय? अर्धा भाजप नबीन यांच्या नेमणुकीच्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. भाजपमधील अल्बर्ट आईन्स्टाईनचा हा नवा शोध, नवा प्रयोग आहे!






























































