
काँग्रेसच्या सभेत एका पदाधिकारी महिलेने केलेल्या ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ या घोषणेवरून सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी लोकसभा व राज्यसभेत आज जोरदार गोंधळ घातला. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.
दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसची ‘व्होट चोर गद्दी छोड’ ही सभा झाली. देशभरातून कार्यकर्ते या सभेला आले होते. तिथे मीडियाशी बोलताना काँग्रेसच्या एका महिलेने मोदींबद्दल वादग्रस्त भाषा वापरली. याचा बाऊ करत भाजपने हा मुद्दा थेट संसदेत उपस्थित केला. लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोनिया, राहुल व प्रियंका गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीतीत मोदींबद्दल शिवराळ भाषा वापरण्यात आल्याचा मुद्दा मांडला. मोदी जगात लोकप्रिय नेते आहेत, त्यांच्याविषयी अशी भाषा स्वीकारली जाणार नाही, असे रिजिजू म्हणाले. त्यांनी हा मुद्दा मांडताच भाजपच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सुरुवातीला दुपारी 12 व त्यानंतर दोनपर्यंत तहकूब करावे लागले. दुपारनंतर कामकाज सुरळीत सुरू झाले.
राज्यसभेत केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी मोदींच्या अपमानाचा विषय मांडला. काँग्रेस पक्ष मोदींच्या मृत्यूची कामना करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या वादग्रस्त शेरेबाजीबद्दल सोनिया, राहुल व प्रियंका गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. परिणामी सुरुवातीला कामकाज दुपारी बारा व त्यानंतर दोनपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज सुरळीतपणे चालले.
घोषणेवर काँग्रेसची महिला जिल्हाध्यक्षा ठाम
ही घोषणा देणाऱया जयपूर महिला काँग्रेस अध्यक्ष मंजू मीना म्हणाल्या, ‘मी काल बरेच काही बोलले होते; मात्र मीडियाने फक्त एकच गोष्ट दाखवली. खरं तर अनेक आश्वासने देऊन मोदी सत्तेवर आले. मात्र 12 वर्षांत त्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. उलट संविधानाची हत्या होतेय. सरकारी संस्था खिळखिळय़ा केल्या जात आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. त्यातूनच ही घोषणा आली आहे. मी त्यावर ठाम आहे.’
प्रियंका गांधी भडकल्या!
सत्ताधाऱयांनी घातलेल्या या गोंधळावर प्रियंका गांधी यांनी मीडियाशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आम्हालाही ही माहिती नवीन होती. सभेच्या व्यासपीठावर तर कोणीच काही चुकीचे बोलले नव्हते. नंतर कळले की कोणीतरी मीडियाशी बोलताना काहीतरी बोलले. कोण बोलले आम्हाला माहीतही नाही. सत्ताधाऱयांनाही माहीत नव्हते. असे असतानाही भाजपचे सदस्य संसदेत त्यावरून गोंधळ घालत होते. त्यांना सभागृह चालवायचेच नाही असे दिसते. आम्हाला प्रदूषणावर चर्चा हवी होती, तीही करायला ते तयार नव्हते. सभागृह चालवायचेच नसेल तर बंद करा. जेणेकरून इथे येणाऱया गाडय़ा कमी होतील आणि प्रदूषणात घट होईल, असा टोला प्रियंका गांधी यांनी हाणला.





























































