दिल्ली-आग्रा द्रुतगती मार्गावर धुक्यात 10 बस-कारची धडक, आगीचा भडका; 4 ठार

delhi agra yamuna expressway accident dense fog multi-vehicle pile up 4 dead 25 injured

मंगळवारी सकाळी दिल्ली-आग्रा द्रुतगती मार्गावर (Delhi-Agra Expressway) दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मथुरेमध्ये (Mathura) झालेल्या या अपघातात सात बस आणि तीन कार एकमेकांवर आदळल्याने वाहनांची मोठी रांग लागली (Multi-Vehicle Pile-up).

मिळालेल्या माहितीनुसार दाट धुक्यामुळे अत्यंत कमी दृश्यमानता (Poor Visibility) असल्याने वाहनांची धडक झाली. धडकेनंतर अनेक वाहनांना आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) श्लोक कुमार यांनी अपघाताच्या माहितीला दुजोरा दिला असून, शोध आणि बचाव कार्य (Search and Rescue Operations) जवळजवळ पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. तसेच, ठप्प झालेला महामार्ग (Blocked Highway) मोकळा करण्याचे आणि अडकलेल्या प्रवाशांना गंतव्यस्थानी पाठवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना एसएसपी कुमार म्हणाले, ‘मंगळवारी सकाळी यमुना द्रुतगती मार्गावर (Yamuna Expressway) झालेल्या मोठ्या रस्ते अपघातात किमान चार लोक मारले गेले असून 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे सात बस आणि तीन कारची ही धडक झाली.’

ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही पाहू शकता, इथे अजूनही धुकं आहे. याच कमी दृश्यमानतेमुळे अंदाजे सात बस आणि तीन छोट्या कार एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कारला आगही लागली.’

बचाव कार्याबद्दल बोलताना एसएसपी म्हणाले, ‘ही बातमी मिळताच आमचे अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि स्थानिक प्रशासन पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, शोध आणि बचाव कार्य आता जवळजवळ पूर्ण झाले आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.’

त्यांनी पुढे सांगितले, ‘अंदाजे 25 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे; मात्र, त्यापैकी कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळत आहेत. याव्यतिरिक्त, येथे उपस्थित असलेल्या उर्वरित लोकांना सरकारी वाहनांद्वारे त्यांच्या घरी अथवा गंतव्यस्थानी पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत.’

जिल्हाधिकाऱ्यांकडून मदत कार्याचा आढावा

मथुरेचे जिल्हाधिकारी (DM) चंद्र प्रकाश सिंह यांनी यमुना द्रुतगती मार्गावरील या घटनेला ‘अत्यंत दुर्दैवी’ म्हटले आणि मदत कार्याची माहिती दिली. दाट धुक्यामुळे घडलेल्या या अपघाताच्या कारणांची चौकशी नंतर केली जाईल, परंतु सध्या मदत कार्यावर लक्ष केंद्रित करणे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत याची खात्री करणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले.

सिंह यांनी पत्रकारांना सांगितले, ‘हा एक अत्यंत दुर्दैवी अपघात आहे. अपघातात ठार झालेल्या चार लोकांचे मृतदेह आम्ही ताब्यात घेतले आहेत. 12 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 14 हून अधिक रुग्णवाहिका तातडीने तैनात करण्यात आल्या. जखमींना सी.एच.सी. बलदेव आणि जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही गंभीर जखमी नाही आणि ते सर्व धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही अपघातामधून बचावलेल्या प्रवाशांना बसद्वारे रुग्णालयात घेऊन जात आहोत. मदत कार्य सुरळीत सुरू आहे आणि संपूर्ण सरकारी यंत्रणेने तातडीने पाऊल उचलले आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा, मदत कार्य सुरू आहे. ही घटना दुःखद आहे. जसे आपण पाहू शकतो, इथे खूप धुकं आणि कमी दृश्यमानता आहे. अपघाबाचे कारण काय, याची चौकशी नंतर केली जाईल; आत्ता आमचे प्राथमिक लक्ष मदत कार्यावर आहे.’

एका दिवसातील दुसरी घटना

मथुरेतील यमुना द्रुतगती मार्गावरील या धडकेपूर्वी, सोमवारी पहाटे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दाट धुक्यामुळे झालेल्या अशाच एका अपघातात अंदाजे 20 वाहनांची धडक झाली होती. सुमारे पहाटे 5:00 वाजता झालेल्या या अपघातात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर 15 ते 20 लोक गंभीर जखमी झाले होते. परिसरावरील दाट धुक्यामुळे झालेली अत्यंत कमी दृश्यमानता हेच या अपघाबाचे मुख्य कारण मानले गेले.