
महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. ज्या समविचारी पक्षांचे आघाडीसाठी प्रस्ताव येतील त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकांच्या रणनितीसाठी टिळक भवन येथे कॉँग्रेसची बैठक झाली. बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यातील 28 पालिकांच्या निवडणुकांच्या रणनितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. मुंबई पालिकेसंदर्भात स्वतंत्र चर्चा करण्यात येईल. उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा पातळीवर मुलाखती होतील व त्यानंतर 25 व 26 डिसेंबर रोजी राज्य पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, असे सपकाळ यांनी सांगितले.






























































