
लोकल ट्रेन आणि मेल-एक्प्रेसचा ताण असलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखली जात आहे. कल्याण-ठाणे ते परळ स्थानकांदरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे. डोंबिवली परिसरात भुयारी मार्गाची उभारणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यात अनुषंगाने प्रकल्पाचा अभ्यास सुरू केला आहे.
मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. 10.8 किलोमीटर लांबीचा ठाणे-कल्याण मार्ग रेल्वेसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. या मार्गावरून दररोज 1,000 गाडय़ा धावतात. ठाणे, दिवा आणि कल्याण ही स्थानके मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांसाठी इंटरचेंज
पॉइंट बनली आहेत. या प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कल्याण-ठाणे-परळ रेल्वे स्थानकांदरम्यान सातव्या आणि आठव्या मार्गिकांच्या उभारणीसाठी अभ्यास सुरू केला आहे. यासंदर्भातील अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी तृतीय-पक्ष संस्थेची नियुक्ती केली आहे. रुळांचे अचूक स्थान, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी कामांसाठी तपशीलवार योजना आणि रेखाचित्रे निश्चित करून नवीन मार्गासाठी अंतिम संरेखन निश्चित करण्याचे काम तृतीय-पक्ष संस्थेवर सोपवले आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारणीचा विचार केला जात असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. प्रस्तावित योजनेंतर्गत डोंबिवलीच्या आधी आणि नंतर काही ठिकाणी भुयारी मार्गाच्या शक्यतेची तपासणी केली जाईल.
ठाणे ते कल्याण मार्गाची प्रशासनाला अधिक चिंता
ठाणे-कल्याण मार्गावर धिम्या आणि जलद दोन्ही मार्गांवर मिळून जवळपास 1,200 उपनगरीय रेल्वे फेऱया धावतात. त्यातच ठाणे स्थानक ट्रान्स हार्बर कॉरिडॉरमार्गे पनवेलशी जोडलेले आहे, तर दिवा स्थानकाचा वापर रोह्यापर्यंत प्रवास करण्यासाठी केला जातो. त्यामुळे दिवा सध्याच्या घडीला सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. येथे रोजच्या 894 लोकल फेऱयांपैकी 70 ते 75 टक्के गाडय़ा थांबतात. परिणामी, दिवा येथील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून किमान 39 वेळा तीन ते पाच मिनिटांसाठी उघडले जाते. याचा लोकल वाहतुकीवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता प्रशासनाला आहे.




























































