
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱयातील दरे गावाजवळ सावरी येथील तेजयश रिसॉर्टजवळ काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलीस पथकाने छापा टाकत 45 किलो अमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या अमली पदार्थांची किंमत 145 कोटी रुपये आहे. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांच्या मालकीचे असून, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवून ठेवल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
सुषमा अंधारे यांनी रिसॉर्टच्या मालकीबद्दल प्रकाश संभाजी शिंदे यांच्या नावावरील सातबारा उतारे, त्याचबरोबर पोलिसांनी छापेमारी करतानाचे व्हिडीओ तसेच आवश्यक ते पुरावे सादर करून ड्रग्ज प्रकरणाचा भंडाफोड केला. या ना त्या कारणाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाचे नाव या प्रकरणात येत असून, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणातील सत्य महाराष्ट्राला सांगणार का? असा सवालदेखील त्यांनी केला.
साताऱ्यातील हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे, तर तेथे असणाऱया शेडचा मालक गोविंद सिंदकर आहे. या शेडची चावी ओंकार डिगे याने घेतली, अशी माहिती गोविंद याने पोलिसांना दिली. याप्रकरणी ओंकार डिगे याला ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. का सोडलं? हे अजून माहिती नाही. असे सांगून अंधारे म्हणाल्या, या प्रकरणांमध्ये सातारा पोलिसांना का कळविले नाही, मुंबई पोलीस का गेले? असा सवाल अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, 13 डिसेंबर रोजी सावरीगावात कारवाई झाली? सुरुवातीला मुकुंदगावात कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे पुण्यात आले, यात विशाल मोरे याला ताब्यात घेतले होते, त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून सावरीगावाची माहिती मिळाली. या गावात पोलिसांचे पथक पोहोचले. मी स्वतः सावरीगावात जाऊन आले. तेथे मला काही धक्कादायक माहिती मिळाली. हे कोयनेचे बॅकवॉटर आहे, इथे स्विमिंग टँक तयार होत आहे. रिसॉर्ट होत आहे, रिसॉर्टजवळ असणाऱया पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. इथे गाव नाही, माणूस नाही तर या शेडला जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला? असा सवाल सुषमा अंधारे यांनी हातातील फोटो दाखवत उपस्थित केला.
पोलीस संरक्षणाची मागणी
या रिसॉर्टमध्ये 7 ते 8 रूम बांधून तयार आहेत, इतर अमेनिटीज तयार होत आहेत, इथे डस्टर गाडी आहे. या कारवाईत 45 किलो ड्रग्ज सापडले. या ड्रग्सची किंमत 145 कोटी एवढी आहे असे अंधारे म्हणाल्या. ड्रग्ज माफियाविरोधात मी सातत्याने आवाज उठवतेय, त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझ्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
सुषमा अंधारे यांनी केले सवाल
रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे गटाचा तालुकाप्रमुख आहे, एकनाथ शिंदे ज्या गावाचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी समोर आल्या. रणजित शिंदे कुठे आहे? त्याचे नेमके काय झाले? रणजित शिंदे याने हे रिसॉर्ट का चालवावे? त्याचा काय संबंध? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले.
पोलीस अधीक्षकांनी माहिती लपवली
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती लपवली. ही लोकं कोण आहेत? याची माहिती त्यांनी दिली आहे. या शेडमध्ये काय काम चालायचं. स्थानिक लोकांनी सांगितल्याप्रमाणे, ही लोकं हिंदुस्थानी नसावीत. त्यांच्या चेहऱयाची ठेवणं वेगळी दिसते. या तीन लोकांना जेवण प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून जात होते. या तीन कामगारांना या पंचतारांकित हॉटेलमधील जेवण कसे परवडत होते? अर्थात ही माहिती पोलिसांच्या तपासातील आहे, तरी त्यांची नावे एफआयआरमध्ये का नाहीत?
प्रकाश शिंदे यांनी ठाण्यातून 2017 साली नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती
पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी की, रिसॉर्टमध्ये तीन लोकं वास्तव्य करत होती. आसाम राज्यातून त्यांना याठिकाणी कुणी आणले? यातले काही बांगलादेशी आहेत. अशी माहिती आहे. ती तीन लोकं कोण त्यांची नावे एफआयआरमध्ये का नाहीत? पोलिसांनी ओंकार डिगे याला का सोडले?
रिसॉर्टला मुलांचे नाव
सावरी येथील या हॉटेलचे नाव तेजयश असून, प्रकाश शिंदे यांच्या मुलांची नावे तेज आणि यश अशीच आहेत. कदाचित त्यावरून या हॉटेलला हे नाव दिले असावे. ओंकार डिगे याचा पोलिसांनी कसून तपास करावा, त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आहे का? हेही पोलिसांनी तपासावे.
अंधारे यांनी उपस्थित केलेले प्रश्न
- कारवाईसाठी साताऱयाऐवजी मुंबईचे पोलीस का गेले?
- दरे गावाचे सरपंच रणजित शिंदे कुठेत?
- निर्जन भागात 75 लाख खर्चून रस्ता का?
- पोलीस अधीक्षकांनी माहिती का लपवली?
- रिसॉर्टमध्ये सापडलेल्या तीन लोकांची नावे एफआरआयमध्ये का नाहीत?
शिंदे हे पाब्लो एस्कोबार त्यांचे ड्रग्ज प्रकरणाशी लागेबांधे – काँग्रेस
सावरी गावातील ड्रग्ज कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पाब्लो एस्कोबार हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तसेच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पाब्लो एस्कोबार आहेत, या पाब्लो शिंदेला अटक का होत नाही, असा प्रश्न सपकाळ यांनी केला.

































































