
नॅशनल हेराल्ड प्रकरणी मुंबई काँग्रेसने ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. ईडीला पुढे करून राजकीय सूडबुद्धीने कारवाई करणाऱया भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱया आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.
मोदी सरकारच्या इशाऱयावर ईडी काम करत असून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाला बदनाम केले जात आहे. या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे. आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोणताही गुन्हा नसतानाही काँग्रेस नेते सोनियाजी व राहुलजी गांधी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. तासन्तास चौकशी करण्यात आली. सत्ताधारी भाजपा विरोधकांना नाहक त्रास देऊन कारवाई करते, पण स्वतःच्या लोकांना वाचवते. सत्ताधारी पक्षाला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय आहे का, असा संतप्त सवाल मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या मोर्चात आमदार अस्लम शेख, डॉ. ज्योती गायकवाड, सचिव सचिन सावंत, प्रवत्ते सुरेशचंद्र राजहंस आदी सहभागी झाले होते.






























































