
बांगलादेशातील तरुण नेते शरीफ ओसमान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराने आता भीषण वळण घेतले आहे. संतापलेल्या आंदोलकांनी ढाका येथील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘प्रथम आलो’ (Prothom Alo) आणि ‘द डेली स्टार’ (The Daily Star) यांच्या कार्यालयांची तोडफोड करून त्यांना आग लावली. या आगीत अडकलेल्या सुमारे ३० पत्रकारांची आणि कर्मचाऱ्यांची बांगलादेश लष्कराने सुटका केली आहे.
‘माझा श्वास गुदमरतोय, तुम्ही मला मारून टाकताय!’
मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा आंदोलकांनी ‘द डेली स्टार’च्या इमारतीला आग लावली, तेव्हा इमारतीत धुराचे लोट पसरले होते. इमारतीत अडकलेल्या पत्रकार झायमा इस्लाम यांनी फेसबुकवर एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली. या महिला पत्रकाराने लिहिले की, ‘माझा श्वास आता गुदमरतोय, चहूबाजूला धूर पसरला आहे. मी आत अडकले आहे. तुम्ही मला मारून टाकत आहात!’ या पोस्टमुळे संपूर्ण माध्यम विश्वात खळबळ उडाली. रात्र पाळीत काम करणारे पत्रकार जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या छतावर धावले होते.

लष्कराने राबवली बचाव मोहीम
अग्निशमन दलाने पहाटे २ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु बाहेर जमाव मोठ्या संख्येने असल्याने पत्रकारांना बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर बांगलादेश लष्कराने हस्तक्षेप केला. लष्कराच्या एका मेजरने धाडसी कामगिरी करत सर्व कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवर लष्कराचे आभार मानताना या मेजरची तुलना बांगलादेशातील प्रसिद्ध काल्पनिक नायक ‘मसूद राणा’शी केली आहे.
ज्येष्ठ संपादकांना मारहाण
या गोंधळात ‘एडिटर्स कौन्सिल’चे अध्यक्ष आणि ‘न्यू एज’चे संपादक नूरुल कबीर यांनाही हिंसक जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये आंदोलक कबीर यांचे केस ओढताना आणि त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ज्या दोन वृत्तपत्रांवर हल्ले झाले, ते अंतरीम सरकारला पाठिंबा देणारे म्हणून ओळखले जातात, तरीही त्यांना लक्ष्य का करण्यात आले, हे अद्याप अस्पष्ट आहे.
सध्या या परिसरात लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.































































