
वीरगावात सोमवारी एक हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. आई विहीरीजवळ कपडे धूत असताना अडीच वर्षांची चिमुकली विहीरीत पडली. विहीरीत मुलगी पडल्याचे लक्षात येताच आठ महिन्याच्या बाळासह आईने विहीरीत उडी घेतली. दुर्देवाने तिच्या मुलीसह तिचे आठ महिन्याच्या बाळाचाही मृत्यू झाला. या घटनेत आई बचावली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत पियुष पोपट मेंगाळ (8 महिने) आणि श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रात्रीच पियुषला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. श्रेयाचा मृतदेह मात्र मंगळवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. आई आशा आणि एका जिवाला काही वेळातच विहिरी बाहेर काढण्यात आले. मृत बालकांवर अंतिम संस्कार करण्यात आले. ही बातमी वा-यासारखी पसरताच वीरगावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोपट मेंगाळ यांचे सात आठ महिन्यापूर्वी अपघातात निधन झाले. तेव्हापासून आशा या आपल्या माहेरी विरगाव येथे राहत आहेत. या घटनेनंतर त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. निष्काळजीपणा, अपघात की आणखी काही ? या सर्व बाबींचा छडा लावण्याचे काम आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे. दरम्यान, दोन चिमुकल्या जीवांचा अकाली अंत आणि त्या आईच्या आयुष्यावर कोसळलेले दुःख या घटनेने वीरगाव हादरून गेले आहे.






























































