
>> स्पायडरमॅन
देशाच्या राजकीय वातावरणात सध्याच्या थंडीच्या काळातदेखील एकदम भडका उडालेला आहे आणि त्याला कारण आहे एक कथित सनसनाटी आरोप. असा दावा केला जात आहे की, 1960 साली हिंदुस्थानने अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेला चीनच्या हिमालयातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी देशातील दुसऱया उंचीचा नंदादेवी पर्वतावर परमाणू ऊर्जेच्या साहाय्याने चालणारे एक टेहळणी यंत्र बनवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र पुढे हे यंत्र त्या ठिकाणाहून हरवले आणि आता त्या यंत्रातील परमाणू ऊर्जा जर गंगा अथवा कोणत्याही दुसऱया हिमालयीन नदीच्या संपर्कात आल्यास करोडो लोकांच्या जिवाला धोका उत्पन्न होणार आहे.
सोशल मीडिया व इतर समाजमाध्यमांवर यासंदर्भात अनेक दावे केले जात आहेत. एका दाव्यानुसार प्रत्यक्षात या कामाला 1964 साली सुरुवात झाली आणि पुढे 1967 व 1969 अशा दोन टप्प्यांत या कामाची पूर्तता झाली. पुढे अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या कर्मचाऱयांनी आपला तळ हलवताना हे यंत्र तिथेच सोडले आणि तेव्हापासून त्या यंत्रामुळे संपूर्ण परिसरात रेडिओ ऑक्टिव पदार्थ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुसऱया दाव्यानुसार चीनने 1964 साली पहिली अणुचाचणी घेतली. सावध झालेल्या अमेरिकेने चीनवर लक्ष ठेवण्यासाठी हिंदुस्थानची मदत मागितली. 1962 च्या युद्धाचा अनुभव घेतलेल्या हिंदुस्थानने त्वरेने होकार दिला. हे टेहळणी यंत्र नंदादेवी पर्वतावर बसवण्यासाठी 1965 साली नॅशनल जिओग्राफिकचे फोटोग्राफर बॅरी बिशप यांच्या नेतृत्वाखाली सीआयए आणि कॅप्टन एम. एस. कोहलींच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी पथक रवाना झाले, परंतु ते शिखराच्या अगदी जवळ असताना प्रचंड मोठय़ा हिमवादळाने त्यांना जीव वाचविण्यासाठी परतावे लागले. येताना त्यांनी ते यंत्र एका गुहेत जखडून ठेवले. मात्र 1966 साली ते यंत्र परत आणण्यासाठी जेव्हा नवे पथक तिथे पोहोचले तेव्हा ते यंत्र गायब झालेले होते. हिमस्खलनामुळे ते यंत्र बर्फात दबले गेले असावे असा कयास आहे.




























































