धावत्या लोकलमधून विद्यार्थिनीला फेकले, पनवेलजवळील धक्कादायक घटना; लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या विकृताचे कृत्य

लेडीज डब्यात घुसलेल्या विकृताने एका विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना हार्बर लाईनवरील पनवेलच्या खांदेश्वर स्थानकाजवळ घडली आहे. घुसखोरी केल्यानंतर डब्यातील महिलांनी याचा जाब विचारल्याने भडकलेल्या या माथेफिरूने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेता महाडिक हिला लोकलबाहेर ढकलले. हा सर्व प्रकार पाहून घाबरलेल्या महिलांनी आरडाओरड करत तत्काळ चेन खेचून लोकल थांबवली. या घटनेत श्वेता ही गंभीर जखमी झाली असून तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती हेल्पलाइनवरून मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळावर धाव घेत आरोपी शेख अख्तर नवाज शेख याला बेडय़ा ठोकल्या आहेत.

पनवेलमध्ये राहणारी विद्यार्थिनी श्वेता महाडिक ही मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. शुक्रवारी दुपारी पनवेल रेल्वे स्थानकावरून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यात चढली. त्याचवेळी मागून विकृत शेख अख्तर नवाज हादेखील महिलांच्या डब्यात चढला. डब्यातील महिलांनी त्याला हरकत घेत आरडाओरड केली. यावर चिडलेल्या माथेफिरू शेख अख्तर नवाज याने डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या श्वेताला धावत्या लोकलमधून फेकून दिले. डोळय़ांसमोर एका विद्यार्थिनीला ढकलून दिल्याचे दृश्य पाहून महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. त्यांनी तत्काळ लोकलची चेन खेचून गाडी थांबवली.

हेल्पलाइनवर तक्रार… पोलिसांची धावाधाव

संतापलेल्या महिलांनी विद्यार्थिनीच्या मदतीसाठी लोकलची चेन खेचली, तर काही महिलांनी रेल्वे हेल्पलाइन नंबरवर फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचला. लोकल खांदेश्वर रेल्वे स्थानकात पोहोचताच पोलिसांनी विकृत शेख अख्तर नवाज याला बेडय़ा ठोकल्या. दरम्यान, या घटनेत श्वेता ही थोडक्यात बचावली आहे. मात्र तिच्या डोक्याला, कंबरेला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.