महाराष्ट्राचा वाळवंट करून नागरिकांना मंगळावर जगण्याची तयारी करून दिली जात आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

पर्यावरण आणि हवामान बदलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढवत आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढते प्रदूषण, अनियमित मान्सूनमुळे ढासळणारी अन्नव्यवस्था आणि हवामान बदलामुळे राज्याच्या कार्यक्षमता व उत्पादकतेवर होणारा परिणाम लक्षात घेता, सरकारकडून उलट दिशेने पावले टाकली जात असल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत मुंबई आणि इतर मोठी शहरे अक्षरशः गुदमरू लागली आहेत. अनियमित पावसामुळे शेती आणि अन्नपुरवठा व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असताना, हवामान बदलाने राज्याच्या अर्थकारणाच्या मुळावरच घाव घातला आहे. असे असतानाही भाजप सरकार पर्यावरण संवर्धनाऐवजी निसर्गाच्या विध्वंसाला प्राधान्य देत आहे.

सरकारकडून 45,000 खारफुटीची झाडे तोडून त्याची तथाकथित भरपाई तब्बल 900 किलोमीटर दूर चंद्रपूरमध्ये केल्याचा आरोप करत, आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाला अर्थहीन ठरवले आहे. याच चंद्रपूरमध्ये महत्त्वाच्या व्याघ्र मार्गात खाणकाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने वन्यजीव संवर्धनालाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईत भरपाई वृक्षारोपण दाखवून प्रत्यक्षात जंगल क्षेत्र नष्ट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही घसरत असल्याकडे लक्ष वेधत, कंत्राटदारांचे हित जपण्यासाठी प्रदूषणाकडे डोळेझाक केली जात आहे. नाशिकमधील पवित्र तपोवन परिसरात 1,800 झाडांची कत्तल, नागपूरमधील अजनी वन क्षेत्र काँक्रिटकरणासाठी लक्ष्य करण्यात येत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मास्टर प्लॅनवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. जंगल क्षेत्र कमी करण्यासाठी आणि मंत्र्यांच्या कथित बेकायदेशीर बंगले व हॉटेल्सना कायदेशीर मान्यता देण्यासाठी हा आराखडा तयार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुंबईकरांसाठी स्वस्त आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक देणारी बेस्ट बस सेवा खासगी हितसंबंधांसाठी हळूहळू संपवली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातील नदीकाठ विकास प्रकल्पामुळे नियोजनशून्य विकास झाल्याने पूरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप करत, मुंबईतील रेसकोर्ससारखी मोकळी हिरवी मैदाने क्लब हाऊस आणि बांधकामासाठी देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकल्पांना पार्कच्या नावाखाली ‘ग्रीनवॉश’ करून जनतेसमोर सादर केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आगामी मुंबई क्लायमेट वीकच्या पार्श्वभूमीवर उपरोधिक टोला लगावत आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, सरकारकडे या सर्व निर्णयांचे सादरीकरण करण्याची मोठी संधी आहे. मात्र प्रत्यक्षात पीआरच्या माध्यमातून या पर्यावरणविरोधी धोरणांचे सौंदर्यीकरण करून वास्तव लपवले जाणार आहे. महाराष्ट्राला हळूहळू वाळवंटात रूपांतरित करून नागरिकांना मंगळासारख्या भूभागावर जगण्याची तयारी करून दिली जात आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.