कोल्हापुरात स्थानिक आघाडय़ांचेच वर्चस्व, शिवसेनेची ‘मशाल’ आठ ठिकाणी विजयी, भाजप तीन, अजित पवार गट, शिंदे गट आणि जन सुराज्यचे दोन नगराध्यक्ष

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नेत्यांसाठी राबणाऱया कार्यकर्त्यांसाठी म्हणून असलेल्या स्थानिक पातळीवरील जिह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा आज धक्कादायक निकाल लागला. राज्यातील सत्तेच्या जोरावर साम, दाम, दंड, भेदसह सर्व यंत्रणा वापरूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मलकापूरला 7 आणि हातकणंगलेमध्ये 1 अशा आठ जागेवर उमेदवार विजयी झाले. नगरपरिषद आणि नगरपंचायतींत स्थानिक आघाडय़ांचेच वर्चस्व दिसून आले.

पेठ वडगाव (यादव आघाडी), शिरोळ (यादव गट), जयसिंगपूर (राजर्षी शाहू विकास आघाडी) आणि कुरुंदवाडमध्ये (राजर्षी शाहू विकास आघाडी) गटांची पूर्णपणे सत्ता आली. तर हुपरी, चंदगड आणि आजरा येथे भाजपचे तीन, कागल आणि गडहिंग्लज (अजित पवार गट), मुरगूड आणि हातकणंगलेमध्ये शिंदे गट तसेच पन्हाळा व मलकापूरमध्ये जन सुराज्य पक्षाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष विजयी झाले. पेठवडगाव, शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड येथे स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व राहिले.

पक्षीय बलाबल पाहिल्यास नगराध्यक्षपदासह भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) प्रत्येकी – 35, जन सुराज्य पक्ष – 25, शिंदे गट – 23, काँग्रेस – 20, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष – 8, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) – 1, अपक्ष – 15.

शिरोळ नगरपरिषद –   नगराध्यक्ष – योगिता कांबळे (यादव गट). येथे यादव गटाचे 16, भैया गट 3 आणि अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले आहेत.

चंदगड नगरपंचायत – नगराध्यक्ष – सुनील कानेकर (भाजप). येथे भाजपचे 8, तर राजश्री शाहू आघाडीचे 8 आणि अपक्ष एक असे नगरसेवक निवडून आले आहेत.

पन्हाळा नगरपरिषद – नगराध्यक्ष – जयश्री पवार (तोरसे) (जन सुराज्य शक्ती). येथे जन सुराज्य पक्षाचे 9, शिवशाहू विकास आघाडी – दोन, शाहू महाआघाडी किल्ले पन्हाळा पार्टी तीन, अपक्ष-चार आणि भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत.

जयसिंगपूर नगरपरिषद – नगराध्यक्ष – संजय शामगोंडा पाटील-यड्रावकर (राजर्षी शाहू विकास आघाडी). येथे राजर्षी शाहू विकास आघाडी – 20, शिरोळ तालुका विकास आघाडी – 5 आणि अपक्ष – 1 नगरसेवक निवडून आले आहेत.

कुरुंदवाड नगरपरिषद – नगराध्यक्ष – मनीषा उदय डांगे (राजर्षी शाहू विकास आघाडी). येथे या आघाडीचे 13 आणि काँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत.

कागल नगरपरिषद – नगराध्यक्ष – सविता प्रताप माने (अजित पवार गट). येथे हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि त्यांचे कट्टर विरोधक व भाजपमधून विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या पक्षात ऐनवेळी दाखल झालेले समरजित घाटगे यांच्यात अनपेक्षित युती झाल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. येथे अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत मुश्रीफ आणि घाडगे यांच्या आघाडीने सर्व 23 जागा पटकाविल्या. शिंदे गटाचे प्रभाव असलेले येथील माजी खासदार संजय मंडलिक यांना एकही जागा मिळवता आली नाही. मुश्रीफ यांचे 14, तर घाटगे गटाचे नऊ नगरसेवक निवडून आले.

हुपरी नगरपरिषद – नगराध्यक्ष – मंगलराव मालगे (भाजप). येथे भाजपचे एकूण 15, शिंदे गट तीन आणि युवक क्रांती आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले.

पेठ वडगाव नगरपरिषद – नगराध्यक्ष – विद्या पोळ (यादव आघाडी). येथे या आघाडीचे सोळा, तर  जन सुराज्य पक्ष आणि तारुणाने आघाडीचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले. येथे आमदार विनय कोरे आणि महाडिक गटाला झटका बसला आहे.

हातकणंगले नगरपंचायत – नगराध्यक्ष – अजितसिंह पाटील (शिंदे गट). येथे शिंदे गटाचे सहा, काँग्रेसचे पाच, भाजपचे दोन, अपक्ष तीन आणि वॉर्ड – 5 मधून महेश प्रसाद पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक विजयी झाले.

मुरगूड नगरपरिषद – नगराध्यक्ष – सुहासिनी पाटील (शिंदे गट). येथे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या युतीला मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. येथे शिंदे गट – बारा, भाजप – 3, श्री छत्रपती शाहू आघाडी – एक आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत.

शिरोळमध्ये आमदार अशोक माने यांची घराणेशाही हद्दपार

शिरोळमध्ये जन सुराज्यचे भाजप पुरस्कृत आमदार अशोक माने यांची घराणेशाही मतदारांनी अक्षरशः हद्दपार केली. त्यांच्या घरच्या मैदानावर त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या स्नुषा सारिका अरविंद माने यांचा दारुण पराभव झाला. तर, नगरसेवकपदासाठी मुलगा अरविंद माने यांचाही दारुण पराभव झाला. शिवाय त्यांच्या पुतण्यालासुद्धा घरचा रस्ता दाखवत, मतदारांनी एक प्रकारे घराणेशाही हद्दपार करून टाकली आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही येथे प्रचार केला होता. तरीही येथे भाजप-ताराराणी आघाडीस सपशेल नाकारल्याचे दिसून आले.

गडहिंग्लज नगरपरिषद – नगराध्यक्ष – महेश महादेव तुर्बतमट (अजित पवार). येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे – 16, जनता दल – 3, तर भाजप आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे. येथे भाजप, जन सुराज्य, शिंदे गट, जनता दल आघाडी या महायुतीला धक्का बसला आहे. प्रभाग 10 (अ) मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल भमानगोळ हे केवळ एका मताने विजयी झाले. ‘जन सुराज्य’चे उमेदवार टुंडाप्पा नेवडे यांचा त्यांनी पराभव केला. राष्ट्रवादीतर्फे प्रभाग 11 (अ) मध्ये उदय परीट तर प्रभाग 7(अ) मध्ये त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रूपाली परीट या विजयी झाल्या आहेत.