
जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुख्यालयाजवळ एका कचराकुंडीत चिनी बनावटीचे ‘असॉल्ट रायफल स्कोप’ सापडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, एका ६ वर्षांच्या मुलाला हे उपकरण सापडले होते आणि तो त्याला खेळणी समजून त्यासोबत खेळत होता.
जम्मूच्या असराराबाद भागात एका सहा वर्षांच्या मुलाच्या हातात एक संशयास्पद वस्तू दिसली. पोलिसांनी तपास केला असता, ते चिनी बनावटीचे स्कोप असल्याचे समोर आले. हे उपकरण स्नायपर रायफलला देखील जोडले जाऊ शकते. मुलाच्या पालकांनी सांगितले की, सकाळी घरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुलाला ही वस्तू सापडली होती.
सुरक्षा यंत्रणा सतर्क, शोधमोहीम सुरू हे स्कोप सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सिधरा परिसरात शोधमोहीम हाती घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जम्मू ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ‘स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप’ (SOG) देखील यामध्ये सामील झाला आहे.
दोन जणांना घेतले ताब्यात या घटनेच्या संदर्भात सांबा जिल्ह्यातून एका २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, एका दुसऱ्या कारवाईत सांबा येथूनच तन्वीर अहमद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी संपर्क क्रमांक सापडल्याची माहिती समोर आली आहे. तन्वीर हा मूळचा अनंतनागचा रहिवासी असून सध्या सांबा येथे वास्तव्यास आहे.
पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून अधिक तपास सुरू आहे.



























































