राजांचा एकछत्री अमल असताना साताऱ्यात अपक्षांची मुसंडी, कराडमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’; फलटणमध्ये रामराजेंच्या मुलाचा पराभव

सातारा जिह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत सातारा, फलटण, वाई, म्हसवडसह 6 नगरपालिका व मेढा नगरपंचायतीवर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. महाबळेश्वर आणि पाचगणीत अजित पवार गटाने बाजी मारली, तर कराडमध्ये लोकशाही आघाडी व यशवंत आघाडी युतीने भाजपला चारीमुंडया चीत केले. साताऱयात बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांची एकत्रित ताकद असताना 9 अपक्षांनी मुसंडी मारली, तर फलटणमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मुलाचा दारुण पराभव झाला.

साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी प्रथमच आघाडय़ांनी न लढता भाजपच्या चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवली. नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी झाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुवर्णा पाटील यांनी मोठे आव्हान दिले होते. नगरपालिकेच्या 50 जागांपैकी 40 जागा भाजपने मिळवल्या असल्या तरी शहरावर राजांचा एकछत्री अमल असताना तब्बल 9 अपक्षांनी मुसंडी मारली. त्यामध्ये सागर पावसे, प्रशांत आहेरराव, दिनाज शेख, सावित्री बडेकर, काका मोरे, शंकर किर्दत यांचा समावेश आहे. शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी झाला. माजी नगराध्यक्ष अशोक मोरे, माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके, माजी नगरसेवक राम हादगे, शिवानी कळसकर, नीलेश मोरे यांचा धक्कादायक पराभव झाला.

रामराजे यांच्या मुलाचा पराभव

फलटणमध्ये नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठsच्या लढतीत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर त्यांचे चिरंजीव अनिकेतराजे यांचा सनसनाटी पराभव झाला. येथे भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना 16489, तर शिवसेनेचे श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांना 15889 मते मिळाली. भाजप-राष्ट्रवादीचे 18, तर शिंदे गट व मित्र पक्षाचे 9 उमेदवार निवडून आले आहेत. फलटण नगरपालिकेत तब्बल 30 वर्षांनी सत्तांतर झाले आहे.

वाईत राष्ट्रवादीला धक्का

वाई विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांची पकड असताना वाई नगरपालिकेवर मात्र भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत विजयी झाले. राष्ट्रवादीने डॉ. नितीन कदम यांच्या रूपाने उच्चशिक्षित व अभ्यासू चेहरा दिला असतानाही भाजपने राष्ट्रवादीला हा धक्का दिला. येथे भाजपला नऊ, राष्ट्रवादीला नऊ जागा मिळाल्या. एक अपक्ष विजयी झाला.

म्हसवडमध्ये भाजपचाच गुलाल

म्हसवड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपच्या पूजा वीरकर विजयी झाल्या. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीचे समर्थन असलेल्या भुवनेश्वरी राजेमाने यांचा पराभव केला. नगरपालिकेच्या सर्व 20 जागा भाजपने मिळवल्या.

रहिमतपूरमध्ये सुनील मानेंना धक्का

गेली अनेक वर्षे रहिमतपूर नगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या सुनीलभैया माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना धक्का बसला. येथे भाजपच्या वैशाली नीलेश माने विजयी झाल्या. या ठिकाणी भाजप व अजित पवार गट यांना प्रत्येकी 9 जागा मिळाल्या. शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

मेढय़ात भाजपला बहुमत

मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह एकूण 18 जागांपैकी भाजपला बारा जागा मिळाल्या. नगराध्यक्षपदी रूपाली वारागडे या 46 मतांनी विजयी झाल्या. नगरपंचायतीत शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक जागा मिळवली.

महाबळेश्वर, पाचगणीत दादा गटाची सरशी

महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिका निवडणुकीत मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाने विजय मिळवला. महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्षपदी सुनील शिंदे विजयी झाले. शिंदे गटाचे उमेदवार कुमार शिंदे यांचा त्यांनी पराभव केला, तर पाचगणीत दिलीप बगाडे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले. त्यामुळे तेथे फेरमतमोजणी करण्यात आली.

कराडमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम

n जिह्याचे लक्ष लागलेल्या कराड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी व शिंदे गटाचे राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील यशवंत आघाडी यांनी एकत्र येऊन भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपचे विनायक पावसकर यांचा तब्बल 9 हजार 735 मताधिक्याने पराभव केला. एकूण 31 जागांपैकी लोकशाही आघाडीला 13, यशवंत आघाडीला 7 आणि त्यांनी पुरस्कृत केलेल्या एका अपक्षाचा विजय झाला. भाजपचा वारू 10 जागांवरच रोखला गेला. मोठा गाजावाजा केलेल्या जनशक्ती आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. माजी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचे चिरंजीव डॉ. आशुतोष जाधव यांना पराभवाची चव चाखावी लागली.

मलकापूरमध्ये शिवसेनेची मशाल

n कराडशेजारच्या मलकापूर नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी विजय मिळवला. मलकापूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद यांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण 22 जागांपैकी भाजपला 18, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2, अपक्षला एक जागा मिळाली. किंगमेकर म्हणून चर्चा झालेले मलकापूरचे राजेंद्र यादव यांचा पराभव झाला.