
शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप करणाऱया भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पितळ नुकत्याच पार पडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीत उघडे पडले. या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये 70 उमेदवार घराणेशाहीतील होते. विद्यमान आमदारांच्या आई, पत्नी, मुले, सुना आणि भावजयींचा त्यात समावेश होता. 70पैकी सर्वाधिक 67 टक्के उमेदवार महायुतीचे होते. त्यातही भाजपचे 42 टक्के उमेदवार होते. त्यामुळे भाजपा केवळ विजयी उमेदवारांच्या संख्येतच नव्हे तर घराणेशाहीच्या बाबतीतही आघाडीवर राहिला आहे.
शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या घराणेशाहीची आकडेवारीच मांडली आहे. 2019पासून ते प्रत्येक निवडणुकीत घराणेशाहीतून मैदानात उतरलेले उमेदवार किती आहेत त्याचा अभ्यास करत आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी तशी आकडेवारी मांडली होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 288पैकी 238 उमेदवार घराणेशाहीशी संबंधित होते, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या असतात. त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये घराणेशाही आपसूकच येते. यंदाही तसे 70 उमेदवार होते. त्यांचा कुठे ना कुठे घराणेशाहीशी संबंध होता. महायुती नव्हती तेव्हा भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप व्हायचा. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर भाजपने शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप करायला सुरुवात केली. भाजपात घराणेशाही नाही असा दावा भाजपा नेते करत होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीच्या जोरावरच भाजपचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत. अजित पवार गटाच्या 33 तर शिंदे गटाच्या 14 उमेदवारांना त्यांच्या घराण्यांच्या प्रतिष्ठsनेच या निवडणुकीत तारले आहे.
अजित पवार गटाची घराणेशाही
मोहिनी नाईक (पुसद) – मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी
सेहरनिदा मुश्रीफ (कागल) – मंत्री हसन मुश्रीफ यांची सून
उर्मिला पेंद्रे (गंगाखेड) – माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण
माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा चिंतन पटेल शिरपूरमधून निवडून आला.
एकनाथ शिंदे गटाची घराणेशाही
\
पूजा गायकवाड (बुलढाणा) – आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी
रेखा बांगर (हिंगोली) – आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी
रत्ना रघुवंशी (नंदुरबार) – आमदार रघुवंशी यांच्या पत्नी
प्रथमेश म्हेत्रे (दुधनी) – माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे
सुनिता पाटील (पाचोरा) – आमदार किशोर पाटील यांची पत्नी
भाजपची घराणेशाही
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती चिखलदरातून तर गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जामनेरमधून विजयी झाल्या.
पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनपुंवर रावल या दोंडाईचा नगरपरिषदेतून निवडून आल्या.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शिनी उईके यवतमाळमधून विजयी झाली.
मंत्री आकाश फुंडकर यांच्या भावजयी अपर्णा फुंडकर या खामगावमधून विजयी झाल्या.
चिंतन पटेल (शिरपूर), अर्चना रोठे (धामणगाव), देवश्री कापगते (साकोली), प्राजक्ता पाटील (अनगर), मिलन कल्याणशेट्टी (अक्कलकोट), प्रतिभा चव्हाण (चाळीसगाव), सत्यजीत कदम (देवळाली), स्वाधीन गाडेकर (राहता) हे विजयी उमेदवार भाजपच्या आजी-माजी आमदारांचे नातेवाईक आहेत.



























































