
भविष्यात देशासाठी मेडल आणू अशी स्वप्ने उराशी बाळगून शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्रात प्रचंड मेहनत करणाऱ्या खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती नवीन नाही. मात्र अजून या शालेय क्रीडापटूंची स्थिती बदललेली नाही. ओडिशामधून उत्तर प्रदेशात ६९ व्या ‘नॅशनल स्कूल रेस्लिंग चॅम्पियनशिप’साठी गेलेल्या १८ तरुण कुस्तीपटूंना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अत्यंत अमानवीय परिस्थितीत प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याच्या शालेय व जनशिक्षण विभागाच्या नियोजनाअभावी या खेळाडूंना रेल्वेच्या शौचालयाजवळ बसून प्रवास करावा लागला.
या पथकामध्ये १० मुले आणि ८ मुलींचा समावेश होता. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जाताना या खेळाडूंना कन्फर्म रेल्वे तिकीट देण्यात आले नव्हते. कडाक्याच्या थंडीत या खेळाडूंना जनरल डब्यातून प्रवास करावा लागला. अत्यंत गर्दी असल्यामुळे त्यांना रेल्वेच्या शौचालयाजवळील जागेत बसून आपला प्रवास पूर्ण करावा लागला. यामुळे या खेळाडूंच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्हिडीओ व्हायरल, लोकांमध्ये संताप
स्पर्धेसाठी जातानाच नाही तर परत येतानाही या खेळाडूंची हीच दयनीय अवस्था होती. रेल्वेच्या शौचालयाजवळ बसलेल्या या खेळाडूंचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमुळे संपूर्ण ओडिशामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची अशी अवस्था पाहून क्रीडाप्रेमी आणि पालकांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
प्रशासनाचा बेजबाबदारपणा या प्रवासादरम्यान खेळाडूंसोबत त्यांच्या पालकांना जाण्याची परवानगी नव्हती, ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. इतकी गंभीर घटना घडूनही शालेय व जनशिक्षण विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
खेळाडूंच्या सन्मानाची आणि मूलभूत सुविधांची अशा प्रकारे पायमल्ली झाल्याने ओडिशातील क्रीडा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


























































