चिअर्स! गुजरातचे पाहुण्यांना ‘गिफ्ट’, ड्राय स्टेटमध्ये मद्यपानाचे नियम शिथिल; आता परमिटशिवाय घेता येणार आस्वाद

gift city liquor rules gujarat dry state exemption (1)
वैधानिक सूचना: मद्यपान आरोग्यासाठी धोकादायक आहे.

गुजरात सरकारने गांधीनगरमधील ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी’ म्हणजेच गिफ्ट सिटीमध्ये मद्यपानाचे नियम अधिक शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, गुजरातबाहेरील व्यक्ती किंवा परदेशी नागरिकांना गिफ्ट सिटीमधील नियुक्त हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी आता ‘तात्पुरत्या परमिट’ची (Temporary Permit) गरज भासणार नाही. केवळ वैध फोटो ओळखपत्र दाखवून त्यांना ही सुविधा मिळू शकणार आहे. राज्य गृहविभागाने २० डिसेंबर रोजी या संदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे या गांधीनगरमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची मोठी सोय झाली आहे.

इंडिया टुडेने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या अधिसूचनेद्वारे मद्यप्राशनासाठीच्या क्षेत्राचा विस्तारही करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या आतील भागातच मद्यपानाची परवानगी होती, मात्र आता लॉन, स्विमिंग पूल परिसर आणि टेरेस अशा खुल्या जागेतही मद्यपान करता येणार आहे. तसेच जेवणासाठी येणाऱ्या व्यक्तींना मद्यपानासाठी राखीव असलेल्या विभागात बसण्याची मुभा देण्यात आली आहे. गिफ्ट सिटीमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, ज्यांच्याकडे ‘लिकर ॲक्सेस परमिट’ आहे, ते आता एका वेळी २५ पाहुण्यांचे यजमानपद भूषवू शकतात. संबंधित कर्मचारी सोबत असल्यास त्यांच्या पाहुण्यांना तात्पुरते परमिट दिले जाईल. गुजरातमध्ये दारूबंदी कायम असली तरी, गिफ्ट सिटीचा आंतरराष्ट्रीय दर्जा आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी २०२३ पासून हे विशेष बदल करण्यात आले आहेत.