संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर छापा, 700 किलो गोमांस जप्त

प्रातिनिधिक फोटो

संगमनेरमध्ये गोमांसाचे अवैध कत्तलखान बंद होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. कारवाया होतात, पण धंदे पुन्हा आडमार्गे सुरूच राहतात. रविवारी मध्यरात्री शहर पोलिसांनी मदिना नगर भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर धडक कारवाई करत ७०० किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत सव्वा दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलीस सागर नागरे यांच्या फिर्यादीवरून फारूक सय्यद याच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंशाची सुटका केली. याशिवाय मदिनानगर गल्ली क्रमांक चारमध्येही जनावरे व वासरे बेकायदेशीररीत्या कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवले असल्याचे आढळून आले. गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी पथकासह ही धाडसी कारवाई केली. जप्त मुद्देमालात गोमांसासह जनावरे व कत्तलीसाठी वापरलेले साहित्य यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत. वारंवार कारवाया होऊनही संगमनेरमध्ये गोमांस धंदे का थांबत नाहीत? या धंद्यांना अभय देणारे कोण? केवळ छापे पुरेसे की मुळावर घाव कधी? नागरिक आता ठोस, कायमस्वरूपी कारवाईची अपेक्षा व्यक्त करत असून गोमांस धंद्याला लगाम कधी घालणार असा सवाल नागरिक करत आहेत.