सामना अग्रलेख – सुधीरभाऊंची सल! भाजपचे ‘शनी शिंगणापूर’

sudhir mungantiwar

पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाजपची तुलना थेट शनी शिंगणापूरशी केली आहे. मात्र एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातच भाजपचे ‘शनी शिंगणापूर’ झाले आहे काय? राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपची दारे सर्वपक्षीय नेत्यांसाठी सताड उघडी आहेत. राज्यातच कशाला, संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाचा ‘शनी शिंगणापूर’ झाला आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांवर घोटाळ्यांचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर सुगंधी तेलाचा अभिषेक करून त्यांना पवित्र करून घ्यायचे सत्र भाजपमध्ये गेली 11 वर्षे सुरू आहे. भाजपचा ‘शनी शिंगणापूर’ होणे ही सुधीरभाऊंच्या मनातील सल आहे व हीच भाजपच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनातील वेदना आहे. देवाभाऊंचे यावर काय म्हणणे आहे?

राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुठला मार्ग वापरतो, हे आता लपून राहिलेले नाही. निवडणुका जिंकण्याचे मंत्र, तंत्र आणि यंत्र भाजपच्या हाती असल्याने आपल्या विजयाचा घोडा भाजपवाले हवा तेथे उधळवतात. तथापि, राज्यभरात सर्वाधिक जागा जिंकणारा हा घोडा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मात्र कमी पडला. संपूर्ण राज्यातील भाजप नेते गुलाल उधळून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करीत असतानाच भारतीय जनता पक्षाचेच विदर्भातील ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे मात्र दुःखी दिसत आहेत. भाजप राज्यभर जिंकतो आणि फक्त चंद्रपुरातच कसा हरतो, असे कोडे सुधीरभाऊंना पडले असावे. चंद्रपूर जिल्ह्यातील अकरापैकी केवळ दोनच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. सात नगरपालिकांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष, तर एका जागेवर अपक्ष निवडून आला आणि एक जागा मिंध्यांनी जिंकली. जिल्हाभरात भाजपला जो सपाटून मार बसला, त्यामुळे सुधीरभाऊंमधील कार्यकर्ता दुखावला व त्यातूनच त्यांनी आपल्या मनातील खंत म्हणा, सल म्हणा, खदखद म्हणा किंवा संताप संयमी भाषेत बोलून दाखवला. ‘‘चंद्रपूर जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण निर्माण झाले. तसे वातावरण निर्माण व्हावे असेच आमच्या पक्षाचे धोरण दिसते. त्यातूनच 11 नगरपालिकांमध्ये आम्ही गटबाजी अनुभवली,’’ अशी जाहीर खंत सुधीरभाऊंनी व्यक्त केली. ‘‘काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. मात्र आमच्या नेत्यांनी माझी शक्ती कमी केली,’’ अशी खंत मुनगंटीवार यांनी या निकालानंतर व्यक्त केली. प्रदेश भाजपचे महत्त्वाचे नेते असलेले सुधीर मुनगंटीवार हे अनेक वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मात्र अजित पवारांच्या रूपाने

कदाचित त्यांच्यापेक्षाही ‘सक्षम’

व ‘प्रामाणिक’ अर्थमंत्री महाराष्ट्र भाजपच्या हाती लागल्यामुळे सुधीरभाऊंच्या मंत्रीपदाचा पत्ता कट झाला. त्यामुळेच भाजपने माझी शक्ती कमी केली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली असावी. त्यातच भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘‘मंत्रीपद नाही म्हणून हरलो, असे नसते,’’ असे विधान करून सुधीरभाऊंच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. त्यावर ‘‘मध्यंतरी बावनकुळेंची शक्ती कमी करण्यात आली होती तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते,’’ असे प्रत्युत्तर सुधीरभाऊंनी दिले. भाजपमध्ये आलेल्या एका नवख्या नेत्याने तर ‘‘सुधीरभाऊ खडसेंच्या वाटेने तर चालले नाहीत ना?’’ असा सवाल करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. सुधीरभाऊंची पक्षात होणारी ही घुसमट केवळ आजची नाही. लोकसभेच्या निवडणुकीपासूनच ते अस्वस्थ आहेत. इच्छा नसतानाही त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास भाग पाडले गेले व तेव्हाही दोन लाखांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला. यामागे पक्षातीलच काही लोक आहेत याचे शल्य त्यांच्या मनात असावे. सुधीरभाऊंच्या मनात बरीच खदखद साचलेली आहे व ती नगरपालिका निकालाच्या निमित्ताने थोडीशी का होईना, बाहेर पडली. सुधीरभाऊ एवढ्यावरच थांबले नाहीत. चंद्रपुरातील पराभवाची जबाबदारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टाकतानाच त्यांनी राज्यभरात दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची घोषणा केली. चंद्रपूरप्रमाणेच राज्यात प्रत्येकच जिल्ह्यात इतर पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांमुळे भाजपच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची कुचंबणा होत आहे हे ओळखून राज्यभरातील निष्ठावंत कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेऊ असे सुधीरभाऊंनी जाहीर केल्यामुळे पक्ष हादरला. निष्ठावंतांचे दुःख ऐकून घेणारा ‘संवाद दौरा’ झाला आणि त्याला

अस्वस्थ कार्यकर्त्यांचा

मोठा पाठिंबा मिळाला तर पक्षाची फजिती होऊ शकते हे नेतृत्वाने हेरले आणि तत्काळ चक्रे फिरली. त्यामुळे काही तासांतच मुनगंटीवार यांनी दुःख ऐकण्याचा ‘संवाद दौरा’ रद्द केला. सुधीरभाऊंनी तूर्तास जरी तलवार म्यान केली असली तरी भाजपच्या संघटनात्मक रचनेवर तिरकस शैलीत भाष्य करून त्यांनी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मात्र नक्कीच बोलून दाखवल्या. मुनगंटीवार म्हणतात, ‘‘भारतीय जनता पक्षाने जे सूत्र अवलंबले, ते ‘शनी शिंगणापूर’सारखे आहे. भाजप हा चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव असा पक्ष आहे, ज्याला दरवाजेच नाहीत. त्यामुळे कोणीही केव्हाही येतो आणि त्याला पक्षात सामावून घेतले जाते.’’ चंद्रपूर जिल्ह्यातील पराभव जिव्हारी लागल्याने एका कार्यकर्त्याच्या तोंडून बाहेर पडलेला हा संताप आहे. शनी शिंगणापूर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान आहे व या गावातील एकाही घराला दरवाजा नाही. भाजपचेही तसेच झाले आहे. पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाजपची तुलना थेट शनी शिंगणापूरशी केली आहे. मात्र एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्यातच भाजपचे ‘शनी शिंगणापूर’ झाले आहे काय? राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपची दारे सर्वपक्षीय नेत्यांसाठी सताड उघडी आहेत. राज्यातच कशाला, संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाचा ‘शनी शिंगणापूर’ झाला आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांवर घोटाळ्यांचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर सुगंधी तेलाचा अभिषेक करून त्यांना पवित्र करून घ्यायचे सत्र भाजपमध्ये गेली 11 वर्षे सुरू आहे. भाजपचा ‘शनी शिंगणापूर’ होणे ही सुधीरभाऊंच्या मनातील सल आहे व हीच भाजपच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनातील वेदना आहे. देवाभाऊंचे यावर काय म्हणणे आहे?