दीप्ती शर्माची ऐतिहासिक झेप : टी-20 क्रमवारीत गोलंदाजीत जगात अव्वल

हिंदुस्थानची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने कारकीर्दीतील सर्वोच्च यश संपादन करत प्रथमच आंतरराष्ट्रीय टी-20 गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. श्रीलंकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या घरच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात तिने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे ही झेप शक्य झाली. चार षटकांत केवळ 20 धावा देत 1 विकेट घेत दीप्तीने सामन्यावर पकड मिळवली आणि हिंदुस्थानच्या 8 विकेट राखून मिळालेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीच्या जोरावर दीप्तीने ऑस्ट्रेलियाच्या ऍनाबेल सदरलँडला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. 28 वर्षीय दीप्ती सध्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यापेक्षा एका गुणाने पुढे आहे. तिची सातत्यपूर्ण गोलंदाजी, अचूकता आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता हिंदुस्थानसाठी मोठी ताकद ठरत आहे. दीप्तीची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून हिंदुस्थानच्या महिला क्रिकेटच्या उंचावलेल्या दर्जाची साक्ष देणारी आहे.