अबब.. एका षटकात टिपले 5 विकेट! इंडोनेशियाच्या गीड प्रियांदनाचा ऐतिहासिक पराक्रम, आंतरराष्ट्रीय टी-20त प्रथमच घडला अनोखा विक्रम

इंडोनेशियाचा वेगवान गोलंदाज गीड प्रियांदना याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. मंगळवारी बालीतील उदयाना क्रिकेट स्टेडियमवर कंबोडियाविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात तब्बल 5 विकेट टिपण्याचा अनोखा विश्वविक्रम केला. हा सामना इंडोनेशियाने 60 धावांनी जिंकला.

28 वर्षीय गीड प्रियांदना हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात 5 विकेट टिपणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या गोलंदाजाने एका षटकात 5 चेंडूंवर विकेट घेतल्या आहेत. याआधी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सलग चार चेंडूंवर चार विकेट घेतल्या होत्या.

एकाच षटकातील 5 विकेटचा थरार

इंडोनेशियाकडून मिळालेल्या 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रियांदना 16 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन फलंदाज बाद करत हॅट्ट्रिक साजरी केली. शाह अबरार हुसैन, निर्मलजीत सिंग आणि चंथोऊन रथानक यांना त्याने माघारी पाठवले. चौथा चेंडू निर्धाव (डॉट बॉल) ठरला. पाचव्या चेंडूवर त्याने मोंगदारा सॉकला बाद केले. त्यानंतर एक वाईड टाकल्यानंतर शेवटच्या चेंडूवर पेल वेननकला बाद करत सामना संपवला. या षटकात कंबोडियाला फक्त 1 धाव करता आली, तीही एका वाईडमुळे. अखेर कंबोडियाचा संघ 60 धावांनी पराभूत झाला. त्याआधी प्रियांदनाने फलंदाजी करताना धर्मा केसुमा याच्यासह 11 चेंडूंमध्ये 6 धावाही केल्या होत्या.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोनदा झाला हा पराक्रम

पुरुष टी-20 देशांतर्गत क्रिकेटमध्ये याआधी दोन वेळा एका षटकामध्ये 5 विकेट टिपण्याचा पराक्रम झाला आहे. पहिल्यांदा 2013-14 मध्ये विक्ट्री डे टी-20 चषक स्पर्धेत अल-अमीन हुसैन याने यूसीबी-बीसीबी इलेव्हनकडून खेळताना अबाहानी लिमिटेडविरुद्ध एका षटकात 5 विकेट घेतल्या होत्या. दुसऱयांदा 2019-20 सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने हरयाणाच्या पाच फलंदाजांना एका षटकात बाद करण्याचा पराक्रम केला होता.