संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर आरोप निश्चित

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी मकोका न्यायालयाने आरोप निश्चित केले. न्यायालयाने सर्व आरोपींना गुन्हय़ाचा तपशीलवार घटनाक्रम वाचून दाखवला आणि आरोप मान्य आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर वाल्मीक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले. खटल्याची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीला विरोध केला म्हणून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचा जीवश्चकंठश्च वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, महेश केदार यांना मकोका लावण्यात आला. आज झालेल्या सुनावणीत न्या. व्यंकटेश पाटवदकर यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचा तपशीलवार घटनाक्रम वाचून दाखवला. त्यानंतर न्या. पाटवदकर यांनी आरोपींना आरोप मान्य आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर वाल्मीक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले. आता या खटल्याची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.

खटला लांबवण्याच्या प्रयत्नाला आळा

मकोका न्यायालयाने आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चित केले. आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असला तरी न्यायालयाने त्याला आळा घातल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खंडणीला विरोध केल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले. एकाच कारणाची पुनरावृत्ती करून आरोपींचे वकील खटला रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हा प्रकार न्यायालयाने रोखला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

कराड पहिल्यांदाच बोलला

आजच्या सुनावणीला सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यापूर्वीच्या सुनावणीमध्ये हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा कधीही बोलला नव्हता. मात्र आज त्याने स्वतः आरोप मान्य नसल्याचे न्यायाधीशांना सांगितले.