अंतराळातील टक्कर टाळण्यासाठी इस्रोचा मोठा निर्णय; ‘बाहुबली’ रॉकेटचे प्रक्षेपण ९० सेकंदांनी लांबणीवर

isro lvm3 m6 launch bahubali rocket delay

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज आपल्या सर्वात शक्तिशाली ‘बाहुबली’ रॉकेटद्वारे (LVM3) इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. मात्र, अंतराळातील संभाव्य टक्कर टाळण्यासाठी इस्रोने या प्रक्षेपणाच्या वेळेत ९० सेकंदांचा बदल केला आहे.

प्रक्षेपणाची नवी वेळ इस्रोचे हे वजनदार रॉकेट (LVM3-M6) बुधवारी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी झेपावणार होते. मात्र, आता हे प्रक्षेपण सकाळी ८ वाजून ५५ मिनिटे आणि ३० सेकंदांनी होईल. अंतराळात असलेल्या उपग्रहांचे अवशेष (Space Debris) किंवा इतर उपग्रहांच्या मार्गात हे रॉकेट येण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीहरिकोटाच्या वरच्या भागात उपग्रहांची मोठी गर्दी असल्याने अशा प्रकारचा ‘टाईम डिले’ होणे ही सामान्य बाब असल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.

काय आहे ‘ब्लूबर्ड ६’ मिशन?

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अमेरिकेच्या ‘एएसटी स्पेसमोबाईल’ (AST SpaceMobile) कंपनीचा ‘ब्लूबर्ड ६’ (BlueBird 6) हा अत्याधुनिक संचार उपग्रह अंतराळात धाडला जाणार आहे. हा उपग्रह थेट अंतराळातून सामान्य स्मार्टफोनवर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवण्यास मदत करेल. यासाठी ग्राहकांना कोणत्याही विशेष उपकरणाची गरज भासणार नाही.

सध्या या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू असून, इस्रोचे हे ८ वे ऐतिहासिक मिशन यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञ सज्ज आहेत.