रोहित शर्माचे झंझावाती शतक; चाहत्यांनी भर मैदानात गौतम गंभीरला डिवचले, म्हणाले – ‘बघतोयस ना?’

rohit sharma slams 155 fans taunt gautam gambhir during vijay hazare trophy

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा सध्या विजय हजारे चषकात आपल्या बॅटने धमाका करत आहे. बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सिक्कीमविरुद्ध खेळताना रोहितने आपल्या खास शैलीत १५५ धावांची तुफानी खेळी केली. रोहितच्या या खेळीमुळे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला जयपूरमधील हजारो चाहत्यांची मोठी करमणूक झाली.

मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने सिक्कीमने दिलेले २३७ धावांचे आव्हान अगदी सोपे केले. त्याने अवघ्या ९४ चेंडूंत १५५ धावा फटकावल्या, ज्यामध्ये १८ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. रोहितच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने ८ गडी राखून आणि ११७ चेंडू राखून हा सामना सहज जिंकला.

चाहत्यांनी गंभीरला का डिवचले?

सामना सुरू असताना मैदानात बीसीसीआय निवडसमितीचे सदस्य आर. पी. सिंग यांची उपस्थिती चाहत्यांनी लक्षात घेतली. रोहित धावांचा पाऊस पाडत असताना चाहत्यांनी हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना उद्देशून घोषणाबाजी सुरू केली. चाहत्यांनी ‘गंभीर कुठे आहे? बघतोयस ना?’ अशा घोषणा देत प्रशिक्षकांना डिवचले. गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये ‘स्टार कल्चर’ संपवण्यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचे बोलले जात आहे.

एका सामान्य दिवशी रोहितला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये २० हजारांहून अधिक लोक जमा झाले होते. नोकरी आणि कॉलेज सोडून लोक ‘हिटमॅन’ची फलंदाजी पाहण्यासाठी आले होते. जेव्हा रोहित फलंदाजीला आला, तेव्हा संपूर्ण स्टेडियम ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा घोषणांनी दुमदुमून गेले होते. रोहितनेही आपल्या चाहत्यांना निराश न करता ३७ वे लिस्ट-ए शतक झळकावले.