
आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा 10 जानेवारीला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. या दिवशी गुरू आणि सूर्य आमने-सामने राहतील. प्रतियुतीच्या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सरासरी कमी असते. त्यामुळे खगोल अभ्यासकांना, जिज्ञासूंना गुरूचे निरीक्षण व अभ्यास करण्याची ही चांगली संधी आहे.
गुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण तेरा महिन्यांचा असतो. याआधी 7 नोव्हेंबर 2024 रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली होती. पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर हे 93 कोटी किमी आहे. गुरूचा व्यास 1,42,800 किमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास 11.86 वर्षे लागतात. 7 डिसेंबर 1995 रोजी मानवरहित यान ‘गॅलिलीओ’ गुरूवर पोहोचले. त्यामुळे या ग्रहाविषयी अधिक माहिती मिळू शकली.
10 जानेवारी रोजी सूर्यास्तानंतर थोडय़ाच वेळात गुरू ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल. व साध्या डोळ्याने पाहता येईल. खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी ही संधी आहे, परंतु गुरूवरचा ग्रेट रेड स्पॉट व युरोपा, गॅनीमीड, आयो व कॅलेस्टो हे चार चंद्र साध्या डोळ्याने दिसू शकणार नाहीत


























































