
गवत जाळल्यामुळे पुन्हा नव्याने चांगले उगवते हा गैरसमज आहे. वणव्यात निसर्गाचे मोठे नुकसान होते. पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची पिल्ले, झाडे-रोपटी आगीत जळून खाक होतात. आपल्या घरावर बॉम्ब पडल्यावर जी अवस्था होते तशीच अवस्था प्राण्यांची होते, असे सयाजी शिंदे आज म्हणाले. ‘देवराई’ला लागलेल्या भीषण आगीत शेकडो झाडे, गवत जळून खाक झाल्यामुळे भावुक झालेल्या शिंदे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणारा अभिनेता सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने आणि वन विभागाच्या सहकार्यातून बीड तालुक्यातील पालवनमध्ये 2017 मध्ये ‘सह्याद्री देवराई’ निर्माण करण्यात आली आहे. ओसाड डोंगर हिरवागार करण्यात आला. अगदी कडक उन्हाळय़ातही झाडांना टँकरने पाणी देत हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र बुधवारी लागलेल्या आगीत हजारो झाडांसह प्राणी-पक्षीही होरपळले.
बीडमधील 15 लाख झाडे कुठे लावली?
जून महिन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कलेक्टर यांनी सांगितले की, बीडमध्ये 15 लाख झाडे लावली, याची नोंद ‘गिनीज वर्ल्ड बुक’मध्ये झाली. कलेक्टरचा सत्कारही करण्यात आला. त्यांनी लावलेली ही झाडे नक्की कुठे लावली? ती आता कुठे आहेत हे प्रशासनाने जाहीर करावे, असे आव्हानच सयाजी शिंदे यांनी दिले. तपोवनमधील झाडांची कत्तल करणे चुकीचे आहे. आतापर्यंत 20-30 देवराई झाल्या आहेत. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला 100 देवराई तयार करायच्या आहेत, असेही सयाजी शिंदे म्हणाले.





























































