आई-वडिलांचा गळफास, दोन मुलांची रेल्वेखाली उडी

मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांचा घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर दोन भावांचे रेल्वे रुळावर मृतदेह सापडले. मात्र या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही.

मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे लखे कुटुंब वास्तव्याला आहे. आज सकाळी रमेश लखे (51) आणि त्यांच्या पत्नी राधाबाई (44) यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा प्राथमिक तपास सुरू असतानाच रमेश यांच्या उमेश (25) आणि बजरंग (22) या दोन तरुण मुलांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानक परिसरात आढळल्याची माहिती आली. एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने पोलीसही चक्रावून गेले. आर्थिक विवंचनेतून पिंवा इतर दुसऱया कारणामुळे या आत्महत्या झाल्या की हा घातपात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.