
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्याची घोषणा झाल्यानंतर ठाण्यातील शिवसैनिक-मनसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा जयजयकार करीत आज शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांची जबरदस्त रॅली ठाण्यात निघाली. या रॅलीत दोन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली टेंभीनाक्यावर पोहोचल्यानंतर तेथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. त्यानंतर शिवसैनिकांनी नौपाडय़ातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात जाऊन फटाक्यांची आतषबाजी केली. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱयांनी पेढे भरवून परस्परांचे तोंड गोड केले. शिवसेना-मनसे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याआधी आज मनसेचे नेते व जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहराध्यक्षा समिक्षा मार्पंडे, विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेच्या चरई शाखेत आले. त्यांचे शिवसेना नेते राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांच्यासह शिवसैनिकांनी स्वागत केले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चरई शाखेतील शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर भव्य रॅली निघाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो, शिवसेना-मनसे युतीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी टेंभीनाका दणाणून गेला.
शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे-पालघर मनसे अध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हाप्रमुख केदार दिघे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहरप्रमुख अनिश गाढवे, मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, मनसेच्या समीक्षा मार्पंडे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे यांनी टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
एकजुटीने, एकदिलाने
धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते कोर्टनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाजवळ पोहोचले. तेथे त्यांनी घटनाकारांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकदिलाने आणि एकजुटीने काम करतील. ठाणे महापालिकेवर आमच्या युतीचा झेंडा नक्की फडकेल, असा विश्वास यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केला.





























































