
‘राहुल गांधी परदेश दौऱयावर असताना हिंदुस्थानी दूतावासाच्या अधिकाऱयांकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपल्या जातात,’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. संसद अधिवेशनाच्या काळात होणारे राहुल गांधी यांचे परदेश दौरे व त्यांनी तिथे केलेल्या भाषणांवर भाजपकडून सातत्याने आक्षेप घेतला जातो. राहुल गांधी देशाची बदनामी करतात असा आरोप केला जातो. सॅम पित्रोदा यांनी हे सर्व आरोप खोडून काढले. त्याचवेळी पेंद्र सरकारच राहुल यांच्यावर पाळत ठेवते व त्यांच्या भेटीगाठींमध्ये अडथळे आणते, असा आरोप पित्रोदा यांनी केला. ‘हॉटेलपासून खासगी बैठकांपर्यंत आणि विमानतळांपर्यंत दूतावासातील लोक आमच्यावर नजर ठेवून असतात. हे मी स्वतः पाहिले आहे’, असे पित्रोदा म्हणाले. ‘राहुल गांधी यांना भेटू नका, असे अनेक परदेशी नेत्यांना मोदी सरकारकडून सांगण्यात येते. याचे लेखी पुरावे नाहीत, हा आमचा अनुभव आहे. ही एक प्रकारची हेरगिरीच आहे,’ असे पित्रोदा म्हणाले.
देशात सांगा किंवा परदेशात, सत्य हे सत्यच असते!
परदेशात जाऊन राहुल गांधी हिंदुस्थानविरोधी वक्तव्ये करत असल्याचा मोदी सरकारचा आरोपही पित्रोदा यांनी खोडून काढला. ‘आजच्या जमान्यात तुम्ही एखादी गोष्ट हिंदुस्थानात बोललात तरी ती जागतिक होऊन जाते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बोललात तरी राष्ट्रीय होऊन जाते. सत्य देशात सांगा किंवा परदेशात, सत्य हे सत्यच असते. त्यात बदल होत नसतो,’ असे पित्रोदा म्हणाले. ‘देशातील संस्था ताब्यात घेतल्या जातायत, मीडिया पक्षपात करतोय, समाजव्यवस्था खिळखिळी केली जातेय, असं काँग्रेसचं मत असेल तर देशात आणि परदेशात दोन्हीकडे ते एकच असणार. परदेशात गेल्यानं ते बदलणार नाही.’






























































