
उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील एका ग्राहकाची तक्रार आता थेट कोर्टापर्यंत पोहोचली आहे. चप्पल बदलून न दिल्यामुळे लिबर्टी शोरूमच्या मॅनेजरविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले. कोर्टाने सीतापूरचे एसपी अंकुर अग्रवाल यांना आदेश देत संबंधित मॅनेजरला अटक करून 2 जानेवारी 2026 रोजी न्यायालयात हजर करण्यास सांगितले.
बट्सगंज येथील रहिवासी आरिफ यांनी 17 मे 2022 रोजी ट्रान्सपोर्ट चौकाजवळील लिबर्टी शोरूममधून 1,700 रुपयांची चप्पल खरेदी केली होती. शोरूमकडून त्या चप्पलला सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली होती, मात्र अवघ्या एका महिन्यातच चप्पल तुटली.आरिफ यांनी शोरूममध्ये जाऊन चप्पल बदलून देण्याची मागणी केली. सुरुवातीला मॅनेजरने टाळाटाळ केली. नंतर चप्पल शोरूममध्ये ठेवून घेतली, पण नवीन चप्पल दिली नाही, ना पैसे परत केले. त्यानंतर आरिफ यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. फोरमकडून अनेक वेळा नोटिसा पाठवण्यात आल्या, पण शोरूम मॅनेजर न्यायालयात हजरच राहिले नाहीत. यानंतर 8 जानेवारी 2024 रोजी ग्राहक फोरमने आदेश देत चप्पलची रक्कम, मानसिक त्रासासाठी 2,500 रुपये आणि खटल्याचा खर्च 5,000 रुपये, अशी एकूण 9,200 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
- ग्राहक मंचाचा आदेश असूनही मॅनेजरने पैसे भरले नाहीत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत पुढील कारवाई सुरू करण्यात आली. अखेर जिल्हा ग्राहक फोरमने सीतापूर पोलिसांना पत्र पाठवून मॅनेजरविरोधात गैरजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश दिले. उत्तर सीतापूरचे एएसपी आलोक सिंह यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल आणि आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले जाईल.





























































