
दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीने विजय हजारे करंडकाचे ग्लॅमर दुसऱ्या साखळी सामन्यातही आणखी वाढले. विराट कोहलीने आपल्या फलंदाजीचा झंझावात कायम राखत दिल्लीला सलग दुसरा विजय मिळवून दिला. मात्र पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणारा रोहित शर्मा गोल्डन डकवरच बाद झाला. तरीही मुंबईने उत्तराखंडचा पराभव करत सलग विजय नोंदवला. तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मू–कश्मीर, बडोदा, पंजाब या संघांनीही सलग दुसरा सामना जिंकला.
2027 मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे ध्येय उराशी बाळगून हजारे करंडकाच्या मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने आजही दिल्लीसाठी मॅचविनिंग खेळी केली. गेल्या सामन्यात 131 धावा करणाऱ्या विराटने आज गुजरातविरुद्ध 61 चेंडूंत 77 धावांची खेळी साकारली. तसेच पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या ऋषभ पंतने 79 चेंडूंत 70 धावा करत आपला हरवलेला फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न केला. या खेळींच्या जोरावर दिल्लीने 255 धावांचे आव्हान ठेवले. त्याचा पाठलाग करताना गुजरातने विजयाच्या दिशेने धाव घेतली होती, मात्र त्यांच्या मधल्या फळीला उभे राहता आले नाही. विजयी लक्ष्य समोर असतानाही त्यांचा संघ दिल्लीने 14 चेंडूआधीच 247 धावांनी संपवला. दिल्लीला अवघ्या 7 धावांनी निसटता विजय मिळवता आला.
आजही 14 शतकांची बरसात
काल 22 फलंदाजांचा शतकी झंझावात पाहायला मिळाला होता, तर आज 14 फलंदाजांनी शतकी खेळी साकारली. कर्नाटकचा देवदत्त पडिक्कलने 147 धावांच्या खेळीनंतर आज 124 धावा करत सलग दुसरे शतक साजरे केले. तसेच आज करुण नायर (ना. 130), यावर हुसेन (138), ध्रुव शोरी (ना. 109), आर्यन जुयाल (134), रिंकू सिंह (ना. 106), ललित यादव (104), पुखराज मान (126), हरनूर सिंग (115), अनमोलप्रीत सिंग (ना. 105), हार्विक देसाई (101), यशवर्धन दलाल (ना. 164), शिखर मोहन (129) आणि करण लांबा (102) यांनीही शतके झळकवली. त्याचप्रमाणे यश दुबे (92), हिमांशु मंत्री (90), युवराज चौधरी (96) आणि हार्दिक तामोरे (ना. 93) यांना नव्वदीतच थांबावे लागले. अन्यथा शतकांचा आकडा आणखी वाढला असता.
शोरीचा सलग पाच शतकांचा विक्रम
राजकोट येथे रंगलेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विदर्भाच्या ध्रुव शोरीने 77 चेंडूंत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. शोरेने लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये नारायण जगदीशनच्या सर्वाधिक सलग शतकांच्या (5) विक्रमाशी बरोबरी केली. लिस्ट ए क्रिकेटमधील शोरीचे हे आठवे शतक होते. त्याला अमन मोखाडेने 78 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 82 धावा, यश राठोडने 82 चेंडूंत 68, रविकुमार समर्थने 46 चेंडूंत 63 धावा करून उत्तम साथ दिली. विदर्भाने दिलेल्या 366 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 276 धावांवर आटोपला. हैदराबादच्या वरुण गौडने 85 धावा केल्या, मात्र त्याचा संघर्ष संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. विदर्भाने हा सामना 89 धावांनी जिंकला.
पडिक्कलचे सलग शतक
गुरुवारी 413 धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या कर्नाटकने आज केरळच्या 285 धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग करत दुसरा सामनाही जिंकला. बाबा अपराजित (71) आणि मोहम्मद अझरुद्दीनच्या (84) खेळींमुळे केरळने 7 बाद 284 धावा केल्या होत्या तर देवदत्त पडिक्कल (124) आणि करुण नायर (130) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 223 धावांची भागी रचत कर्नाटकला 8 विकेट आणि 10 चेंडू राखून सहज विजय मिळवून दिला. पडिक्कलने गुरुवारीही 147 धावांची जोरदार खेळी केली होती.
‘‘रिंकू’च्या वादळात चंदिगडचा पालापाचोळा
चंदिगडविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या रिंकू सिंह नावाचे वादळ पाहायला मिळाले. अवघ्या 60 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 106 धावांची तुफानी खेळी करून रिंकूने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील त्याची निवड सार्थ ठरवली, तर आर्यन जुयालने 118 चेंडूंत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 134, तर ध्रुव जुरेलने 57 चेंडूंत 67 धावांची खेळी करत रिंकूला उत्तम साथ दिली. उत्तर प्रदेशने उभ्या केलेल्या 368 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना चंदिगडचा डाव अवघ्या 140 धावांवर गडगडला. उत्तर प्रदेशने या सामन्यात 227 धावांनी मोठा विजय मिळवला.
राजेश मोहंती ठरला हीरो
सर्वत्र फलंदाजांचा बोलबाला सुरू असतानाच ओडिशाचा वेगवान गोलंदाज राजेश मोहंतीने इतिहास रचला आहे. सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात मोहंती लिस्ट ए क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा ओडिशाचा पहिला गोलंदाज ठरला. ओडिशाच्या मोहंती आणि संबित कुमार बराल या दोघांच्या तुफान माऱ्यापुढे सर्व्हिसेसचा डाव अवघ्या 83 धावांवर गडगडला. डावाच्या सातव्या षटकात मोहंतीने हॅटट्रिक साधली. मोहंतीने 9 षटकांत 25 धावा देत 4 फलंदाज बाद केले, तर बरालने 8.5 षटकांत 21 धावा देत 4 विकेट घेतल्या. लहान लक्ष्याचा पाठलाग करतानाही ओडिशाची दमछाक झाली. सर्व्हिसेसच्या पूनम पूनिया (4/27) आणि नितीन यादव (2/20) यांनी सुरुवातीलाच जोरदार धक्के दिले, परंतु संदीप पटनायकने संयम दाखवत 69 चेंडूंत नाबाद 32 धावा करून संघाला 24.3 षटकांत विजय मिळवून दिला. ओडिशाने 84 धावांचे आव्हान सहा विकेट गमावून 4 विकेट्सनी विजय मिळवला.






























































