
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यासाठी जमलेला क्रिकेटप्रेमींचा उत्साह एका क्षणात मावळला. मुंबईकडून खेळत असलेला रोहित शर्मा शून्यावर बाद होताच स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला आणि काही वेळातच प्रेक्षकांच्या रांगा बाहेरच्या दिशेने वळल्या.
उत्तराखंडविरुद्धच्या या लढतीत रोहितला 25 वर्षीय वेगवान गोलंदाज देवेंद्र सिंग बोराने पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रोहितचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला झेलला गेला. आठ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत रोहितच्या पुनरागमनामुळे जयपूरमध्ये मोठा उत्साह होता. सकाळी सहा वाजल्यापासूनच थंडी असूनही शेकडो चाहते स्टेडियमबाहेर जमा झाले होते.
मुंबई पहिल्यांदा फलंदाजी करणार असल्याचे कळताच स्टॅण्ड भरू लागले, मात्र रोहित बाद होताच वातावरण बदलले. अनेक प्रेक्षकांनी नो बॉलची पंचांकडे दाद मागितली, तर मोठय़ा संख्येने चाहते सामना अर्धवट सोडून बाहेर पडले.
विशेष म्हणजे, याच मैदानावर सिक्कीमविरुद्ध रोहितने 94 चेंडूंत 155 धावांची वादळी खेळी करत 18 चौकार आणि 9 षटकार ठोकले होते. त्या सामन्यात मोफत प्रवेशामुळे 15 हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते, मात्र यावेळी रोहितचा एकच अपयशी चेंडू आणि स्टेडियम अक्षरशः रिकामे झाले.























































