
सोने आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी कायम असून सलग चौथ्या दिवशी किमतींनी नवा उच्चांक गाठला. इंडियन बुलियन अॅण्ड ज्चेलरी असोसिएशनच्या (आयबीजेए) माहितीनुसार चांदीचा भाव एकाच दिवसात 13,117 रुपयांनी वाढला. त्यामुळे चांदी 2.32 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली. याशिवाय 24 कॅरेट सोन्याचा दर 1,287 रुपयांनी वधारून 1,37,914 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. या वर्षी चांदीने तब्बल 150 टक्के परतावा दिला असून त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदीने चांदी केली आहे. काही दिवसांपूर्वी चांदीच्या किमतीने प्रथमच दोन लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. या वर्षी चांदीचा भाव 1.46 लाख रुपये प्रति किलोने वाढला आहे, तर सोनेदेखील 61 हजार रुपयांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसांमध्ये चांदीचा भाव 36 हजार रुपयांनी वाढला आहे. तसेच सोनेदेखील या कालावधीत पाच हजार रुपये प्रति तोळा एवढे महागले आहे.
एवढी तेजी कशामुळे?
चीनसारखे देश आपल्या मोठय़ा प्रमाणावर सोन्याचा साठा वाढवत आहेत, ते वर्षभरात 900 टनांपेक्षा जास्त खरेदी करत आहेत, त्यामुळे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत आहेत. सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्हीमध्ये मोठय़ा प्रमाणावर चांदीचा वापर होत आहे. त्यामुळे चांदी आता एक आवश्यक कच्चा माल बनली आहे.
आयपीओतून मिळाले 2 लाख कोटी रुपये
2025 या वर्षात 365 पंपन्यांनी शेअर बाजारात आयपीओ आणले. त्यातून त्यांनी 1.95 लाख कोटी रुपये गोळा केले. यापैकी मेनबोर्डच्या 106 आयपीओतून 1.83 लाख कोटींचा निधी पंपन्यांनी गोळा केला आहे. हा आकडा एकूण आयपीओच्या 94 टक्के असल्याचा अहवाल समोर आला आहे.
शेअर बाजार कोसळला
आठवडय़ाच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 367 अंकांनी घसरून 85,041 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी घसरून 26.042 वर बंद झाला. आयटी, ऑटो, रियॅलिटी आणि बँकिंग शेअर्स घसरले.
‘केअरिंग हँड्स’ने दिली 5.5 लाखांहून अधिक मुला-मुलींना नवदृष्टी
खासगी विमा पंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डच्या ‘केअरिंग हँड्स’ या सीएसआर उपक्रमाला 14 वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत अनेक यशस्वी उपक्रम राबवत वंचित समुदायातील मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी असलेली वचनबद्धता पंपनीने अधोरेखित केली आहे. 2011 मध्ये सुरू करण्यात आलेला या उपक्रमांतर्गत 5.5 लाखांहून अधिक मुला-मुलींच्या डोळ्यांची तपासणी केली असून 50,000 हून अधिक मुला-मुलींना चष्मे दिले आहेत. मुला-मुलींमधील दृष्टिदोष खूप आधी ओळखण्यात आणि टाळता येण्याजोग्या दृष्टिदोष रोखण्यात या उपक्रमाने मोलाचा आधार दिला आहे.
‘कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो’चे मुंबईत आयोजन
इंडियन पेपर कोरूगेटेड अॅण्ड पॅकेजिंग मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयसीपीएमए) आणि फ्युचरेक्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो’चे 19 ते 22 मार्च 2026 या कालावधीत मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. यापूर्वी 2024 मध्ये दिल्ली येथे पहिल्यांदा प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अत्याधुनिक मशिनरींचे लाईव्ह डेमो, नॉलेज सेशन्स, तसेच भारत-विदेशातील अव्वल ब्रँड्सशी नेटवार्ंकग इत्यादी यावेळी होणाऱया प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण राहणार आहेत. या प्रदर्शनात 250 हून अधिक मशिनरी आणि टेक्नॉलॉजी सप्लायर्स सहभागी होणार असून नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचाही मोठा सहभाग अपेक्षित आहे.
































































