
पैशांसाठी एका निर्दयी मातेने तिच्या सात दिवसांच्या बाळाला विकल्याची धवःकादायक घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदलापुरात उघडकीस आली आहे. हे बाळ विकत घेण्यासाठी पोलिसांनीच बनावट ग्राहक पाठवले. ५ लाख ८० हजारांच्या बदल्यात दलालांनी हे बाळ ग्राहकांकडे सुपूर्द करताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे यांच्या तक्रारीवरून बदलापूर पोलि सांनी याप्रकरणी पाच दलालांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सबिना हिने आपले हे सात दिवसांचे बाळ ५ लाख ८० हजाराला विकण्याचा निर्णय घेतला. याची कुणकुण दलालांच्या टोळीला लागली आणि सबिना या टोळीच्या जाळ्यात अडकली. तिने कोणत्याही प्रकारची दत्तक विधानाची कागदपत्रे तयार न करताच हे बाळ विकण्यासाठी दलालांना सुपूर्द केले. हे दलाल बाळ विकणार असल्याची कुणकुण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध गुन्हे शाखेच्या ठाणे विभागाच्या पथकाला मिळाली. त्यांनी या दल ालांशी खोट्या नावाने संपर्क करून बाळ विकत घेण्याची तयारी दाखवली.
बदलापूर येथील भारत महाविद्यालय रस्त्यावरील साईशबरी या उपाहारगृहाजवळ पोलिसांनी पेरलेल्या बनावट ग्राहकाने दलालांना बोलावले. तिथे शंकर मनोहर (३६, रा. इगतपुरी), रेशमा शेख (३५, रा. मानखुर्द), नितीन मनोहर (३३, रा. इगतपुरी), शेखर जाधव (३५, रा. जोगेश्वरी), आसीफ खान (२७, रा. मानखुर्द) ही दलालांची टोळी बाळाला घेऊन आली. बनावट ग्राहकाने बनावट नोटांच्या गड्ड्या दलालांना दिल्या आणि त्यांच्याकडून या बाळाचा ताबा घेतला. त्याचवेळी सापळा लावून बसलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून या टोळीला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.





























































