
निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचाऱ्यांचे जोडे चाटत आहात, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर केली. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या फडणवीसांचा संजय राऊत यांनी आपल्या खास शब्दात समाचार घेतला. ते शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
रशीद मामू हा विषय सोडून द्या, निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही या देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचाऱ्यांचे जोडे चाटत आहात. अजित पवार, अशोक चव्हाण यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भ्रष्टाचारी ठरवले होते. त्यांचे जोडे कोण आणि कशा करता चाटत आहे? हे सगळे एकाच माळेतील मणी आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
भाजप सत्तेत आल्यापासून बंडाळ्या वाढल्या
भाजप सत्तेत आल्यापासून अलीकडच्या काळात प्रत्येक निवडणुकीत बंडाळ्या वाढल्या आहेत. बंडाळ्यांना उत्तेजन दिले जात आहे. पूर्वी निवडणुकीच्या रिंगणात मोजके पक्ष होते. आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी आहेत. असंतुष्टांना पर्याय उपलब्ध आहेत. त्यात पैशाचा वापर करून लोक विकत घेतले जातात आणि बंडाळ्या होतात, असेही संजय राऊत म्हणाले.
Photo – हाती घेऊ मशाल रे… पाप जाळू खुशाल रे..! संभाजीनगरात प्रचाराचा श्रीगणेशा
भाजपने कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवादावर निवडणुका लढल्या!
मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांना प्रचारासाठी आयात करणार आहे. याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. भाजपने मुंबईची फाळणी केलेली आहे. एक परप्रातियांची मुंबई आणि दुसरी मराठी माणसाची. आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे. जे मुंबईकर आहेत, त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावे. पण भाजपने कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईत सुद्धा तेच करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
तुम्ही सक्षम नाहीत का?
भाजपला योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर मुंबईत कशाकरता पाहिजे? तुम्ही सक्षम नाहीत का? हा जर मतदार मुंबईचा नागरीक आहे, मुंबईकर आहे, तर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्यासमोर गेले पाहिजे. पण तुम्ही योगी आदित्यनाथ, रेखा गुप्ता, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार. मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई, महाराष्ट्रात? तुम्ही जिंकण्याची गोष्ट करता, मग तुम्ही जिंकून दाखवा ना, असे आव्हानच राऊत यांनी दिले.




























































