Ashes 2025-26 – इंग्लंडने 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा 2 दिवसात निकाल

मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 175 धावांचे आव्हान इंग्लंडने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियातील विजयाचा दुष्काळ संपवला. इंग्लंडने तब्बल 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकला. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने हा कारनामा करून दाखवला. वेगवान गोलंदाज जोश टंग याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

मेलबर्न कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांमध्ये संपला. पहिल्या दिवशी तब्बल 20 विकेट्स पडल्या होत्या. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 152 धावांमध्ये गुंडाळाले, तर ऑस्ट्रेलियानेही परतफेड करत इंग्लंडचा 110 धावांमध्ये खुर्दा उडवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दाणादाण उडवली आणि यजमान संघाचा डाव 132 धावांमध्ये गुंडाळला. कार्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर स्टोक्सने 3, टंगने 2 आणि एक्लिटनने एक विके्टस मिळवली.

पहिल्या डावात आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे 175 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला डकेट आणि क्राउलीने अर्धशतकीय सलामी दिली. स्टार्कने डकेटला 34 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानतर आलेला कार्सही 6 धावांवर बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली. इंग्लंडने शतकी धावांचा टप्पा ओलांडल्यावर क्राऊली (37), बेथेल (40), रूट (15) आणि स्टोक्सच्या (2) विकेट्स गमावल्या. मात्र ब्रुकने एक बाजू लावून धरत संघाला विजय मिळवून दिला. तो 18 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्टार्क, रिचर्डसन आणि बोलंडने प्रत्येकी दोन विके्टस घेतल्या.

ऐतिहासिक विजय

इंग्लंडचा हा विजय अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला. इंग्लंडने 1962 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात चौथ्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग केला. तसेच इंग्लंडने ऑस्ट्रेलियात 18 कसोटी लढतीनंतर विजय मिळवला. एवढेच नाही तर तब्बल 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात विजयाची चव चाखली. याआधी इंग्लंडने ऑस्ट्रेलियात अखेरचा कसोटी विजय जानेवारी 2011 मध्ये मिळवला होता.

दोन दिवसात निकाल

अॅशेस मालिकेत दोन दिवसात कसोटी संपण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 1888 मधील लॉर्ड्स कसोटी, 1888 मधील ओव्हल कसोटी, 1888 मधील मॅन्चेस्टर कसोटी, 1890 मधील ओव्हल कसोटी, 1921 मधील नॉटिंघम कसोटी, 2025 मधील पर्थ कसोटीचा निकालही दोन दिवसात लागला होता.