
डॉ. समिरा गुजर-जोशी
कर्णे चामरचारुकम्बुकलिका कण्ठे मणीनां गण। सिन्दूरप्रकर शिरपरिसरे पार्श्वान्तिके किङ्किणी ।
लब्धश्चेन्नृपवाहनेन करिणा बद्धेन भूषविधि । स्तत्किं भूधरधूलिधूसरतनुर् मान्यो न वन्य करी ।।
कानांवर चामरासारख्या शोभिवंत झुली, गळ्यात मण्यांचे हार, मस्तकाभोवती सिंदुराची रेषा, बाजूला मंजुळ नाद करणार्या घंटा असे सारे अलंकार लाभले आहेत असा राजाचा हत्ती आणि ज्याचे शरीर पर्वतावरील धुळीने माखलेले आहे असा वन्य हत्ती यामध्ये वन्य हत्तीच श्रेष्ठ आहे. कारण अलंकारांनी मढलेला असला तरी राजहत्ती शेवटी बांधलेला आणि वनातील गजराज धुळीने माखूनही स्वतंत्र आहे. राजहत्ती बांधलेला असून दुसर्याच्या आदेशावर फिरणारा आहे. त्याउलट जो हत्ती डोंगरावर मुक्तपणे संचार करताना माती-धुळीने माखलेला आहे, तो कोणाच्याही सेवेत बांधलेला नाही; म्हणूनच असा धुळीने माखलेला ‘वन्य’ हत्ती कमी दर्जाचा नसून, उलट अलंकृत पण गुलाम हत्तीपेक्षा श्रेष्ठ ठरतो. कवी इथे स्पष्टपणे सांगतो की खरे मोठेपण अलंकारात, मान्यतेत किंवा राजाश्रयात नसून स्वातंत्र्यात आहे; आणि जिथे स्वातंत्र्य आहे, तिथे धूळही भूषण ठरते.





























































